१. प्रवृत्ती आणि निवृत्ती
‘प्रवृत्ती’ आणि ‘निवृत्ती’ या दोन स्वतंत्र अन् एकमेकांपासून भिन्न अशा अवस्था आहेत. प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही शब्दांत ‘वृत्ती’ हा मूळ शब्द आहे. ‘वृत्ती म्हणजे विचार’, विशिष्ट हेतूला धरून धावणारे विचार. ‘बहिर्मुखी हेतूने प्रेरित झालेले विचार, म्हणजे ‘प्रवृत्ती’ आणि नेमके याच्या उलट ‘वृत्तीचा अभाव म्हणजे ‘निवृत्ती.’ अर्थातच ‘वृत्ती नसणे’, ही मनाला प्राप्त झालेली एक परिस्थिती आहे; म्हणूनच तिला ‘अवस्था’ म्हणावयाचे.
२. सद्गुरूंची कर्मे निवृत्तीच्या आधारावर घडत असणे !
सद्गुरूंचे बळ निवृत्तीत असते. सहजप्राप्त असेल, तर उपभोगाचा आनंद सद्गुरु घेतील; पण ते प्राप्तीच्या मागे लागणार नाहीत. काहीच त्यांना भुरळ पाडू शकत नाही आणि आकृष्टही करू शकत नाही. इतके ते तृप्त आणि म्हणूनच निवृत्त असतात. निवृत्तीच्या आधारावरच त्यांच्याकडून कर्मेही घडतात. जणू निवृत्तीच्या वृक्षाला प्रवृत्तीची फळे लागावीत; म्हणून त्यांची मानसिक स्तरावरील सर्व शक्ती संग्रहित झालेली असते. संग्रहित शक्ती म्हणजेच ‘बळ’. असे अपरंपार बळ सद्गुरूंजवळ साठवलेले असते.’
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)