कोलकाता (बंगाल) – बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्यावर राजभवनाच्या एका कंत्राटी महिला कर्मचार्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, याविषयी एक अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले असून या प्रकरणातील साक्षीदारांकडून माहिती घेतली. तसेच आम्ही राजभवनाला सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आवाहनही केले आहे. राज्यघटनेच्या कलम ३६१ नुसार विद्यमान राज्यपालांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही.
१. महिलेचा आरोप आहे की, ती २४ मार्च या दिवशी कायमस्वरूपी नोकरीसाठी राज्यपालांकडे गेली होती. त्यानंतर राज्यपालांनी तिच्याशी गैरवर्तन केले.
२. राजभवनानेही एक निवेदन प्रसारित केले असून त्यात राज्यपाल बोस यांनी राजभवनात पोलिसांच्या प्रवेशावर बंदी घातल्याचे म्हटले आहे. यात पुढे म्हटले आहे की, पोलीस त्यांच्या राजकीय धन्यांना खूश करण्यासाठी निवडणुकीच्या काळात बेकायदेशीरपणे अन्वेषण करू शकतात.
माझ्या अपकीर्तीचा कट ! – राज्यपाल बोस
राज्यपालांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, माझी अपकीर्ती करण्याचा हा कट आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. सत्याचा विजय होईल. मी भ्रष्टाचार आणि हिंसाचार यांच्या विरोधातील लढा थांबवू शकत नाही.