ऑस्ट्रेलियात सध्या महिलांच्या विरोधात तेथे मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात विविध शहरांत मोर्चे काढले जात आहेत. हे वर्ष चालू झाल्यानंतर आतापर्यंत ४ महिन्यांत कौटुंबिक हिंसाचारामुळे २६ महिलांची हत्या करण्यात आली आहे. महिलांवरील कौटुंबिक अत्याचारांचे तेथील प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी तेथील महिलांवरील कौटुंबिक अत्याचारांच्या प्रश्नाला ‘राष्ट्रीय संकट’ म्हटले आहे. तेथील विविध शहरांत मोठ्या संख्येने या विरोधात मोर्चे निघू लागल्यावर तेथील पंतप्रधान अल्बानीज यांनी ‘राष्ट्रीय कॅबिनेट बैठक’ बोलावणार असल्याचे सांगितले. मोर्चांमध्ये खुद्द पंतप्रधानांसह तेथील नेतेही सहभागी झाले.
स्त्रीवादाचा बडेजाव !
ऑस्ट्रेलियात सध्या निर्माण झालेल्या महिलांवरील अन्यायाच्या अटीतटीला आलेल्या सूत्रामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि काही तथ्येही समोर येतात. ज्या पाश्चात्त्य देशांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची संकल्पना उदयाला आली, त्या पाश्चात्त्य देशांचे प्रतिनिधित्व करणार्या ऑस्ट्रेलियात आज महिलांवरील कौटुंबिक अत्याचारांचे प्रमाण एवढे वाढले की, देशभरात महिलांवर एकत्र येऊन मोर्चे काढण्याची वेळ आली. ही स्थितीच बोलकी आहे. आश्चर्य म्हणजे लोकशाहीचा उगम पाश्चात्त्य देशांमध्ये झाला, तरी पूर्वी तेथील महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता (मग ती ‘लोक’शाही कशी होती देव जाणे !); ऑस्ट्रेलिया हा महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातील दुसरा देश होता. महिलांना संसदेत निवडून देण्याचा अधिकार देणारा पाश्चात्त्य देशांतील हा पहिला देश होता. ऑस्ट्रेलियात महिलांसाठी अनेकदा कायद्यात पालट केले आहेत. तिथे कायद्याने विवाहातील बलात्काराला गुन्हा ठरवले गेले आहे. तिला गर्भपात करण्यास भाग पाडले, तर तो गुन्हा आहे. अनेक वर्षे तेथील स्त्रियांना समान कामासाठी अल्प वेतन दिले जात होते. आता कायद्याने तिला पुरुषासारखे काम करण्यासाठी अल्प वेतन देणे बेकायदेशीर केले आहे. तिथे सशुल्क प्रसुती रजा संमत आहे. सांगायचे सूत्र म्हणजे स्त्रीवादाला पूरक ठरणारे कायदे तेथील शासनाने केले असले, तरी तेथील महिला या सर्व सुविधा घेऊन तारेवरची कसरत करत आहेत; परंतु तरीही प्रत्यक्षात मात्र कौटुंबिक अत्याचारांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. मग स्त्री स्वातंत्र्याने नेमके काय हातात पडले ? हा विरोधाभास प्रकर्षाने समोर येतो.
महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सध्या ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वाढीला पुरुषी अहंकार कारणीभूत असल्याचे तेथील तज्ञांचे मत आहे. ऑस्ट्रेलियात ‘द्वेषयुक्त भाषा वापरणे’ सध्या ‘नवरुढी’ (ट्रेंड) झाली आहे. २३ टक्के ऑस्ट्रेलियन पुरुषांना ‘ऑनलाईन लैंगिकतावादी भाषा वापरणे’ योग्य वाटते. पाचपैकी एक ऑस्ट्रेलियन पुरुष एखाद्या महिलेच्या संमतीविना तिची अश्लील छायाचित्रे ऑनलाईन प्रसारित करणे पसंत करतो, असे निरीक्षणही पुढे आले आहे. तेथील ७५ टक्के पौगंडावस्थेतील मुलांना अश्लील चित्रफिती पहाण्याची सवय आहे. महिलांचा अपमान करणे, पुरुष वर्चस्ववादी विचारसरणीचा प्रचार करणे या गोष्टीही वाढल्या आहेत. या सार्या गोष्टीही महिलांवरील अत्याचारांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारणीभूत ठरू शकतात.
भारतातील स्थिती
विदेशातील स्त्रीवाद, मानवतावाद यांसारख्या समानतावादाचा वर्ख लावलेल्या; परंतु आतून पोकळ आणि वरवरच्या अन् बहुतांश प्रमाणात निरर्थक ठरलेल्या संकल्पना भारतासारख्या संस्कारक्षम, मोठ्या कौटुंबिक वातावरण असलेल्या देशात गेल्या शतकात शिरल्या. त्यामुळे भारतीय समाजातही उलथापालथ घडली. त्यानंतर पाश्चात्त्यांनाच त्यांच्या आधुनिकतावादातून आलेल्या स्त्रीवादासारख्या संकल्पनांचा पोकळपणा लक्षात आला आणि तिथे त्याविरोधात चळवळी चालू झाल्या. त्याला आता २५ वर्षे होत आहेत ! भारतीय समाजवादी, पुरोगामी, साम्यवादी यांसाठी ही खरेतर मोठी चपराकच आहे; पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून येथील आधुनिकतावाद्यांनी त्यांचे पाश्चात्त्यीकरण चालूच ठेवले आहे. असो. भारतीय समाज स्त्रीवादी नव्हता का ? ‘गृहिणी’ या शब्दाचा अर्थ ‘स्वामिनी’ असा आहे; मात्र मागील ३००-४०० वर्षांत सामाजिक उलथापालथामुळे भारतातही स्त्रियांवरील अत्याचारांची प्रकरणे पुढे आली. भारतात सध्या स्त्रियांवरील कौटुंबिक अत्याचारांचे प्रमाण २९.३ टक्के आहे.
भारतात ज्यांना कट्टर स्त्रीवादी म्हणून पाहिले जाते, त्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी अलीकडेच स्त्रीवादाविषयी मांडलेले िवचार नुकतेच गाजले. त्या म्हणाल्या होत्या, ‘स्त्रीवाद हे फालतू सूत्र आहे. ‘स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने असतात’, या सूत्रावर विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा पुरुष गर्भ धारण करतील, तेव्हा ते महिलांच्या बरोबरीने येतील.’ यावरून ‘दोघांचे सामर्थ्य भिन्न असल्याने स्त्री-पुरुषांची बरोबरी करायला नको’, हे लक्षात येते. नोरा फतेही या अभिनेत्रीनेही, ‘स्त्रीवाद हा बकवास आहे. स्त्री-पुरुष हे समान नाहीत. स्त्रीवादाने समाज बिघडवला आहे’, असे विधान केले होते. यावरून ‘कृत्रिम स्त्रीवादाच्या अतिरेकाने समाजाला मोठे दुष्परिणामही भोगायला लागत आहेत’, हे लक्षात येते. ‘भारतात किंवा पाश्चात्त्य देशांत कौटुंबिक हिंसाचार किंवा स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पाश्चात्त्यांचा स्त्रीवाद अंगीकारणे आवश्यक आहे का ?’, हा प्रश्न यामुळे उद्भवतो. स्त्रिया समान हक्कांसाठी पुरुषी वर्चस्ववादाच्या विरोधात लढल्या; मात्र आता स्त्री वर्चस्ववाद वाढत चालला असल्याचेही पुढे येत असून याकडेही सामाजिक समस्या म्हणून पाहिले जात आहे.
कोरोना महामारीच्या काळापासून अमेरिकेत ‘ट्रॅड वाईफ’ म्हणजे ‘पारंपरिक पत्नी’ अशा अर्थाची एक नवरुढी रुजू लागली. त्यामध्ये घर, मुले सांभाळणार्या पारंपरिक पत्नी होण्यास प्राधान्य देणे, तसा पोशाख, केशभूषा करणे आदी गोष्टी चालू झाल्या. हा ‘स्त्रीत्व’ रुजवण्याचा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियातील आंदोलनाची लाट पहाता ‘स्त्रीवादाने अपेक्षित हेतू कितपत साध्य झाला ?’, असा प्रश्न निर्माण होतो. तसाच तो भारतातील स्त्रियांवरील अत्याचार किंवा तिची ससेहोलपट पहातांना होतो. इथे जुने-नवे असा भेद करण्याचा उद्देश नसून दोन्हीचा अतिरेक टाळून दोन्हीतील योग्य गोष्टी घेऊन काळानुरूप पुढे जाणे अपेक्षित आहे !
जागतिक स्तरावर रुजलेल्या स्त्रीवादामुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्यांकडे डोळेझाक करून कसे चालेल ? |