कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – वर्ष २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने २ भारतीय हेरांना देशाबाहेर काढल्याचा दावा ‘एबीसी न्यूज’ या ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तवाहिनीने केला आहे. ‘द ऑस्ट्रेलियन’ आणि ‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ यांनीही हा अहवाल प्रसारित केला आहे. भारतीय हेरांनी ऑस्ट्रेलियातील संरक्षण प्रकल्प आणि विमानतळ सुरक्षा व्यवस्था यांच्याशी संबंधित गुप्त माहिती चोरण्याचा प्रयत्न केला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या कटामागे भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’चे अधिकारी होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भारतीय हेरांना अटक करून देशाबाहेर हाकलण्यात आले, असा दावा या अहवालात करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर संघटनेचे महासंचालक माईक बर्गेस यांनीही हे संकेत दिल्याचे वर्ष २०२१ च्या वार्षिक धोका अहवालात नमूद करण्यात आले आहे; मात्र हे हेर कोणत्या देशाचे आहेत ? हे त्यांनी सांगितले नव्हते.
भारताशी आमची चांगली मैत्री असून आम्हाला या प्रकरणात अडकायचे नाही ! – ऑस्ट्रेलिया सरकार
ऑस्ट्रेलिया सरकारमधील वरिष्ठ मंत्री जिम चालमर्स यांनी यासंदर्भात म्हटले की, आम्हाला या प्रकरणात अडकायचे नाही. भारताशी आमचे चांगले संबंध आहेत. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांच्या प्रयत्नांमुळे आमचे संबंध सुधारले आहेत. दुसरीकडे भारताकडून या प्रकरणी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकाभारताची झपाट्याने होत असलेली भौतिक प्रगती, तसेच हिंदु पुनरुत्थानाचे कार्य आज जगातील अनेक प्रगत देशांना बघवत नाही ! अशी वक्तव्ये नैराश्यातूनच केली जात आहेत, हे जाणा ! |