मंडणगड : ५ गावांतील महाविकास आघाडीच्या सहस्रो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

कार्यकर्त्यांचा शिवसेना आमदार योगेश कदम यांच्याविषयी विश्‍वास व्यक्त !

मंडणगड – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षांचे सरपंच या पदासह विविध दायित्वे सांभाळणारे पालवणी, पाले, कळकवणे, कोन्हवली अन् लाटवण या गावांतील सहस्त्रो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तालुक्यातील जनमत हे सत्ताधारी पक्षांच्या विरोधात असल्याच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या दाव्याला शिवसेना आमदार योगेश कदम यांनी या माध्यमातून चुकीचे ठरवल्याचे बोलले जात आहे. ३० एप्रिल या दिवशी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमास माजी सभापती आदेश केणे, रामदास रेवाळे, अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विरोधकांच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसून मतदार सरकारच्या विरोधात नव्हे, तर सरकारच्या विकासाच्या धोरणाच्या बाजूने असल्याची प्रतिक्रिया आमदार योगेश कदम यांनी या कार्यक्रमानंतर दिली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमदेवारास तालुक्यातून १० सहस्त्रांचे मताधिक्य मिळवून देणार असल्याची भूमिका जाहीर करतांना विधानसभा निवडणुकांपुर्वी तालुक्यातील अनेक गावे राज्यातील शिंदे सरकाराच्या कारभारावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत सहभागी होणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.