घाटकोपर येथे राज्यस्तरीय परिषद !
मुंबई – राज्यातील ऐतिहासिक गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहेत ?, याची दिशा निश्चित करण्यासाठी घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये पुरातत्व विभागाचे अधिकारी, इतिहास अभ्यासक, स्थापत्यतज्ञ आणि दुर्गप्रेमी सहभागी झाले होते.
या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पुरतत्व आणि वास्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि शिक्षणाय संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या विषयावर या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
१. दुर्ग संवर्धनासाठी इच्छाशक्ती, जनजागृती, लोकसहभाग, योग्य मार्गदर्शन, तसेच आर्थिक बळाची आवश्यकता असल्याची भावना या परिषदेत व्यक्त करण्यात आली. पुरातत्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकार डॉ. कुरुष दलाल यांनी दुर्गसंवर्धनावरील परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
२. दुर्ग अभ्यास आणि पुरातत्व संशोधक डॉ. सचिन जोशी, वास्तूविशारद आणि वारसा संवर्धन सल्लागार राहुल चेंबूरकर, स्थापत्यतज्ञ तेजस्विनी आफळे, जैवविविधता तज्ञ आनंद पेंढारकर, किल्ले अभ्यासक अमित सामंत यांनी या परिषदेतील विविध परिसंवादांमध्ये सहभाग घेतला. अमित सामंत यांनी या वेळी किल्ल्यांवरील जलव्यवस्थापनाविषयी सखोल सादरीकरण केले.
३. महेंद्र गोवेकर यांनी ‘दुर्गभ्रमंती’ या विषयावर मार्गदर्शन करतांना गडांचे महत्त्व सांगितले. परिषदेतील शोधनिबंध सादरीकरणामध्ये राज्यातील विविध गडांविषयीचे संशोधनाचे सादरीकरण त्यांनी केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाहक सुधीर थोरात यांनी दुर्ग संवर्धनातून संस्कृती संवर्धनाची आवश्यकता आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले. दुर्गप्रेमी कमलाकर इंदुलकर आणि राहुल मेश्राम यांच्या मुख्य सहभागाने कार्यक्रम पार पडला.