नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक

सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरण

नवी मुंबई – वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सार्वजनिक शौचालय घोटाळा प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ एप्रिल या दिवशी ए.पी.एम्.सी. मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. संजय पानसरे यांनी मे. निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ सहस्र रुपये इतके असतांना ते ८ सहस्र रुपये इतके अल्प करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवले आहे.

यापूर्वी ए.पी.एम्.सी.चे संचालक आणि आजी-माजी अधिकार्‍यांनी कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया डावलून आपल्या मर्जीतील संस्थांना वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रसाधनगृहांचे मनमानीपणे वाटप करून ए.पी.एम्.सी. मार्केटची ७ कोटी ६१ लाख ४९ सहस्र रुपयांची हानी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीतील ८ आजी-माजी अधिकार्‍यांच्या विरोधात ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहार, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला होता. गुन्हे शाखेने या प्रकरणात तिघांना अटक केली होती.