तात्काळ काम चालू न केल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची ग्रामस्थांची चेतावणी !
देवगड : दीड वर्षापूर्वी कार्यारंभ आदेश देऊनही तालुक्यातील धनगरवाडी, साळशी येथील नळपाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ न झाल्याने येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे साळशी नळपाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ चालू करावे अन्यथा देवगड पंचायत समिती कार्यालयासमोर २ मे या दिवशी उपोषण करू, तसेच लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू, अशी चेतावणी धनगरवाडीतील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिली आहे.
या योजनेचा कार्यारंभ आदेश १२ ऑक्टोबर २०२२ या दिवशी देण्यात आला आहे; मात्र कामास प्रारंभ करण्यात आला नाही. परिणामी गावातील धनगरवाडी या अतीदुर्गम आणि डोंगराळ भागातील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या देवगड उपविभागाकडून धनगरवाडी नळपाणीपुरवठा योजनेकरता विहिरीसाठी दिलेल्या भूमीत पाणी मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विहिरीसाठी पाण्याची पातळी चांगली असलेल्या भूमीचे बक्षिसपत्र झालेले आहे; मात्र पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात न आल्याने कामास प्रारंभ झालेला नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
या अनुषंगाने गटविकास अधिकार्यांच्या दालनात ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली. या वेळी गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी संबंधित अधिकार्यांना ‘योग्य ती कार्यवाही करून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी’, अशी सूचना दिली.
संपादकीय भूमिकामूलभूत सुविधांसाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? |