मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भेसळयुक्त पेढे आणि बर्फी विकणार्‍या प्रसाद विक्रेत्यांवर शासनाच्या अन्न आणि औषध विभागाने कारवाई करून सुमारे ५५ सहस्र किमतीचे पेढे अन् बर्फी जप्त केली. मंदिरात दर्शनासाठी जातांना भाविक प्रसाद म्हणून परिसरातील प्रसाद विक्रेत्यांकडून पेढे विकत घेतात. ‘धार्मिक स्थळी प्रसाद म्हणून विकली जाणारी मिठाई  दुधापासूनच बनवलेली आहे ना ?’, याची निश्चिती करण्याचे आवाहन सहआयुक्त संजय नारागुडे यांनी नागरिकांना केले आहे. प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे हेच पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे. गेल्या वर्षीही याच परिसरात प्रसाद बनवण्यासाठी आणला गेलेला बिनादुधाचा खवा प्रशासनाने कह्यात घेतला होता.

प्रसिद्ध मंदिरांचे उत्सव, यात्रा, नागरिकांचे सुट्टीचे दिवस या काळात मंदिरांना सहस्रोंच्या संख्येने भाविक भेट देतात. ‘मंदिरातील  चैतन्य बाह्य विक्रेत्याच्या मिठाईमध्ये उतरलेले असते’, या भावाने भाविक श्रद्धेने मिठाई खरेदी करतात. शिर्डीच्या साई मंदिरात विकला जाणारा पेढाही भेसळयुक्त खव्यापासून सिद्ध केला जात असल्याचे गेल्या वर्षी उघड झाले होते. वर्ष २०२२ मध्ये आषाढी वारीच्या काळात पेढ्यांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी पंढरपूर येथील एका व्यापार्‍याला अटक करून त्याच्याकडील १५० किलो भेसळयुक्त पेढे अन्न आणि औषध विभागाने जप्त केले होते. या मिठाईत ‘स्टार्च’ आढळले होते. भाविकाने आणलेला भेसळयुक्त प्रसाद ग्रहण केल्यामुळे कुणाला शारीरिक त्रास झाला किंवा गंभीर परिणाम जाणवले, तर तो खाणार्‍याचा देणार्‍यावरील विश्वास तर उडेलच, तसेच ज्या देवतेच्या नावाने प्रसाद ग्रहण केला, त्या देवतेवरील त्याची श्रद्धाही उणावू शकते. भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्ल्यास खवखवणे, खोकला येणे, पोटात दुखणे यांसह चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब चालू होणे, कावीळ होणे आदी गोष्टी होतात. किडनी आणि यकृत यांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. विषबाधा अधिक झाल्यास खाणार्‍याचा मृत्यूही ओढावू शकतो. कृत्रिम दुधात युरियाची भेसळ असल्यास युरियातील नायट्रोजनमुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय निकामी होऊ शकते. मावा करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध केमिकलयुक्त असल्यास अजामीनपात्र गुन्हा, तर मिठाईतील दुधात पाणी आणि दुधाची पावडर आढळल्यास गुन्हेगारास आर्थिक दंड होतो. भाविकांच्या श्रद्धेशी आणि जीवाशी खेळण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. भाविकांनीही मिठाई नामांकित दुकानातून खरेदी करावी, तसेच त्याचा ‘एक्सपायरी’ (पदार्थ संपवण्याचा अंतिम) दिनांकही पडताळून घ्यावा.

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.