हिंदी चित्रपटातील गाणी लावल्यामुळे खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी डी.जे. बंद करायला लावला !

नागरिकांच्या तक्रारीमुळे श्रीरामनवमी कार्यक्रमातील प्रकाराविषयी कृती

खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी

(डी.जे. – मोठा आवाज करणारी ध्वनीयंत्रणा)

पुणे – कोथरूड भागातील एम्.आय.टी. परिसरामध्ये डी.जे. वाजवत श्रीरामनवमीचा कार्यक्रम साजरा केला जात होता. त्या ठिकाणी भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. (सौ.)  मेधा कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करत नागरिकांना त्रास होत असल्यामुळे कार्यक्रम बंद केला. ही घटना १७ एप्रिल या दिवशी रात्री घडली. (नागरिकांना त्रास होईल, अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रम केल्यास त्यातून कार्यक्रम साजरा करण्याचा उद्देश साध्य होणार का ? – संपादक)

‘सियाराम प्रतिष्ठान’कडून श्रीरामनवमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘रामनवमीच्या कार्यक्रमांमध्ये हिंदी चित्रपटातील गीते वाजवली जात असल्याने तो बंद करावा’, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली होती. त्याविषयी खासदार कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली होती. खासदार कुलकर्णी यांनी कार्यक्रम बंद केला म्हणून युवकांनी नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही रामनवमीला प्रभु श्रीरामाचे गीत लावले होते, लैला मजनूचे नाही’ असे म्हणत वाद घातला.

खासदार प्रा. (सौ.)  मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “एम्.आय.टी. परिसरामध्ये रामनवमीच्या कार्यक्रमांमध्ये हिंदी चित्रपटातील गाणी वाजवली जात आहेत. त्याविषयी रामबाग वसाहत परिसरातील नागरिकांनी मला भ्रमणभाष करून परिस्थिती सांगितली. नागरिकांना समस्या होत असेल, तर असा प्रकार आम्हाला मान्य नाही.”

संपादकीय भूमिका :

धर्माचरणाच्या अभावामुळे आणि धर्मसंस्कार नसल्याने नागरिकांकडून देवतांच्या जन्मदिनी चित्रपटगीते लावण्याचे प्रकार होतात !