घरातच नजरकैदेत रहाणार
नेपिदाव – म्यानमारच्या सैन्यदलाने देशाच्या नेत्या आँग सान स्यू की यांची अचानक कारागृहातून सोडवून घरी पाठवले. आँग सान स्यू की यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या घरी त्या नजरकैदेत असतील, असे म्यानमारच्या सैन्यदलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आंग सान स्यू की यांना ठोठावली होती ३३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा !
म्यानमारच्या सैन्यदलाने वर्ष २०२१ मध्ये आँग सान स्यू की यांचे लोकशाही पद्धतीने स्थापन केलेले सरकार उलथून लावत देशात लष्करी राजवट लागू केली. तेव्हा आँग सान स्यू की यांना अटक करण्यात आली. म्यानमारच्या सैन्यदलाच्या न्यायालयाने पदच्युत नेत्या आँग सान स्यू की यांना १९ गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत त्यांना ३३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून त्या कारागृहात होत्या.
सैन्यदलाने आँग सान स्यू की यांची शिक्षा ६ वर्षांनी केली अल्प !
म्यानमारमध्ये आणीबाणीची स्थिती ओढवल्यानंतर सैन्यदलाच्या सरकारने पदच्युत नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आँग सान स्यू की यांची शिक्षा ६ वर्षांनी अल्प करून ती २७ वर्षे केली होती. म्यानमारच्या सैन्यदल सरकारचे प्रमुख जनरल मिन आंग हलाईंग यांनी अन्य ७ सहस्र ७४९ कैद्यांचीही सुटका केली आहे.