अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

१७ एप्रिल (चैत्र शुक्ल नवमी) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…

‘अयोध्येत स्थापन झालेल्या ५ वर्षांच्या श्री रामलल्लाच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेतल्याने सर्व जण राममय झालेले आहेत. या सुंदर मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आपण या लेखमालिकेतून जाणून घेणार आहोत. या लेखात ‘श्री रामलल्लाच्या ५ वर्षे वय असलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव, तसेच श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूने केलेल्या कलाकृतीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये’ दिली आहेत. (भाग १)

१. अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या ५ वर्षांच्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

श्रीरामाच्या जन्मापासून शिवधनुष्य भंग होण्यापर्यंत प्रभु श्रीरामामध्ये श्रीविष्णूचे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते. शिवधनुष्य भंग करून सीतेशी स्वयंवर केल्यावर श्रीरामामधील शक्ती जागृत झाली आणि त्याच्याकडून श्रीविष्णूच्या तत्त्व लहरींसहित रामतत्त्वयुक्त अन् सीतामय झालेल्या दैवी शक्तीचे प्रक्षेपण वाढले. सध्या धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये सूक्ष्मातून घनघोर धर्मयुद्ध चालू आहे. या निर्णायक धर्मयुद्धात अधर्माचा पराभव करून धर्माचा विजय होण्यासाठी अधर्मी शक्तींना निर्गुणाच्या स्तरावर पराभूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्या निर्गुण स्तरावरील रामतत्त्वाची अधिक प्रमाणात आवश्यकता असल्यामुळे ईश्वराच्या इच्छेने अयोध्येत निर्गुण रामतत्त्वाचे प्रतीक असणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठा झालेली आहे.

२. श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला आणि वर केलेल्या कलाकृतींची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

टीप १ – ‘महिरप’ या शब्दाचा मराठी भाषेत अर्थ आहे, ‘कौशल्य, चातुर्य, हुशारी, किंवा कारागिर’.

संदर्भ : मराठी विश्वकोश आणि मराठी शब्दकोश. या लेखातील कोष्टकात ‘महिरप’ या शब्दाचा अर्थ कारागिराने केलेली सुंदर कलाकृती’ या अर्थाने वापरला आहे.

टीप २ – श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या भोवतीच्या महिरपीमध्ये कोरलेल्या कलाकृतींमध्ये कार्यरत झालेले दैवी तत्त्व हे पृथ्वीवर स्थुलातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती देऊन त्यांना श्रीरामाच्या मूर्तीच्या रूपाने सूक्ष्मातून मार्गदर्शन करत आहे.

३. कृतज्ञता : सर्वार्थाने आदर्श असणार्‍या प्रभु श्रीरामाच्या बालरूपातील श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि मूर्तीतून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणारे सूक्ष्मातील कार्य याचे ज्ञान दिल्याविषयी मी श्रीगुरुचरणी अनन्यभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

(क्रमशः)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/784879.html