‘समर्थ युवा फाउंडेशन’ आणि ‘युवा स्वराज्य प्रतिष्ठान’ यांच्या वतीने आयोजित पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरातील मुलाखत !
पुणे – मुंबईवर झालेल्या २६/११च्या आतंकवादी आक्रमणाला त्याच वेळी प्रत्युत्तर द्यायला हवे होते, अशी भूमिका मांडून परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारला लक्ष्य केले. ‘मुंबईवरील आक्रमणानंतर प्रत्युत्तराविषयी ‘यूपीए’ सरकारमध्ये चर्चाही झाली; परंतु पाकिस्तानवर आक्रमण करण्याची किंमत आक्रमण न करण्यापेक्षाही अधिक असल्याचा निष्कर्ष तेव्हा काढला गेला आणि प्रत्युत्तर दिले गेले नाही’, असा आरोप जयशंकर यांनी केला. ‘समर्थ युवा फाउंडेशन’ आणि ‘युवा स्वराज्य प्रतिष्ठान’ यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात मुलाखतीत ‘जर्नी ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया’ या विषयावर जयशंकर बोलत होते. विजय चौथाईवाले यांनी त्यांची मुलाखत घेतली.
जयशंकर पुढे म्हणाले की,
१. शस्त्र म्हणून आतंकवादाचा वापर करणार्या पाकिस्तानला वेळीच उत्तर दिले असते, तर आजची वेळ आली नसती. पाकिस्तानच्या आतंकवादाचा प्रारंभ वर्ष १९४७ पासूनच झाला. काश्मीरमध्ये टोळीवाल्यांना पाठवणे, हे आतंकवादी कृत्यच होते. काश्मीरमधील शहरे, गावे जाळण्यात आली; माणसे मारली गेली. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या वायव्य सरहद्द प्रांतातील आदिवासींचा त्यासाठी वापर केला. त्या वेळी आपण संयुक्त राष्ट्रांमध्ये दाद मागितली; मात्र तेव्हा आतंकवादी आक्रमण हा शब्द कुठेही उच्चारला गेला नाही.
२. १९६५च्या युद्धापूर्वीही पाकिस्तानने काश्मीरमध्ये अशाच प्रकारे आतंकवादी घुसवले. आतंकवादाविषयी भारताचे धोरण आता पालटले आहे. पाकिस्तानच्या अशा आतंकवादी कारवाया कोणत्याही परिस्थितीत आता खपवून घेतल्या जाणार नाहीत.
मुंबईवर २६/११ चा झालेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर द्यायला हवे होते कि नाही ? असा प्रश्न त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितांना केला. ‘यूपीए’ सरकारच्या काळात प्रत्युत्तर देण्याविषयी चर्चा झाली होती. तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याविषयी लेखन केले आहे. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणास प्रत्युत्तर न दिल्यास पुढील आक्रमण कसे रोखणार ?, असा प्रश्नही जयशंकर यांनी केला.
आतंकवाद्यांना उत्तर देतांना कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
पाकिस्तानशी संबंध ठेवणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे; मात्र आतंकवादाच्या जोरावर भारताला तडजोड करण्यास भाग पाडू, असे कुणाला वाटत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. आतंकवादी सीमेपलीकडे असल्याने त्यांना कुणी हात लावू शकत नाही, असे कुणाला वाटता कामा नये. आतंकवादी कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांना उत्तर देतांना कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत. |
संपादकीय भूमिका :पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक ! |