काशी विश्‍वनाथ मंदिरात पुजार्‍यांच्या वेशात पोलीस !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ मंदिरात जगभरातून भाविक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अलीकडेच वाराणसीच्या पोलीस आयुक्तांनी काशी विश्‍वनाथ मंदिराच्या गर्भगृहात तैनात असलेल्या पोलिसांच्या पोशाखात पालट केला आहे. नवीन आदेशानुसार, गर्भगृहात तैनात असलेले पोलीस पुरोहितांप्रमाणेच भगवे धोतर-कुर्ता आणि रुद्राक्षाची माळ  घालतील, तसेच कपाळावर त्रिपुंड लावतील, तर महिला पोलीस कर्मचारी भगव्या सलवार-कुर्त्यात असतील. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेकांनी टीका, तर काही जणांनी समर्थन केले आहे.

सौजन्य Oneindia Hindi

काशी विश्‍वनाथ मंदिरात भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. अशा स्थितीत अनेकदा गैरवर्तन किंवा धक्काबुक्की झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे मंदिरात वेगळ्या प्रकारच्या पोलीस यंत्रणेची आवश्यकता भासू लागली. त्याअंतर्गत काशी विश्‍वनाथ मंदिराच्या गर्भगृहात पुजार्‍यांच्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याखरीज मंदिरात ‘टच पॉलिसी’ही लागू करण्यात आलेली नाही, या अंतर्गत पोलीस भक्तांना रांगेमध्ये पुढे जाण्यासाठी धक्का मारणार नाहीत किंवा हात लावणार नाहीत.

ज्योतिषांकडून समर्थन !

या पोशाखाविषयी येथील ज्योतिषी पंडित शशी शेखर त्रिपाठी म्हणाले की, हा निर्णय योग्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार तो पोलीस दंडाधिकारी असून क्रूर तत्त्व मंगळाशी संबंधित आहे, तर मंदिर आणि मंदिराचे वातावरण देवगुरु बृहस्पतीचे प्रतिनिधित्व करतात. गुरूचा संबंध धर्म आणि अध्यात्म यांच्याशी आहे. पुरोहिताचा पेहराव करणार्‍या पोलिसांमुळे मंगळ तत्त्व न्यून होऊन गुरु तत्त्व वाढेल. हे चांगले आहे. धार्मिक ठिकाणी गुरूचे वर्चस्व अधिक असावे.