सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाला समाजातून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्‍या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांना हे लेख लिहितांना शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच या संशोधनात्मक लेखांना वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद इत्यादी सूत्रे पाहूया.

१. संशोधनात्मक लेख लिहितांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. मधुरा कर्वे

१ अ. लिखाणाच्या सेवेतून साधिकेत विविध गुण विकसित होणे : साधारण ६ वर्षांपासून मी संशोधनात्मक लेख लिहिण्याची सेवा शिकत आहे. आरंभीच्या काळात ‘हे लेख लिहायला मला जमतील का ?’, असा विचार येऊन मला ताण यायचा. त्या वेळी मी श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी शरण जाऊन प्रार्थना करायचे. तेव्हा ‘ते मला सूक्ष्मातून मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवायचे. संशोधनात्मक लेख लिहिण्याची सेवा शिकत असतांना हळूहळू माझ्यात एकाग्रता, चिकाटी, अभ्यासूवृत्ती, उत्तम निरीक्षणक्षमता, शिकण्याची वृत्ती इत्यादी गुण विकसित होत गेले. आरंभीच्या काळात केलेले लिखाण आणि सध्या करत असलेले लिखाण यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर ‘या ६ वर्षांच्या कालावधीत श्रीगुरूंनी मला घडवण्यासाठी किती अपार कष्ट घेतले आहेत’, याची जाणीव होऊन खूप कृतज्ञता व्यक्त झाली.

१ आ. ‘साधकाला सेवेचा ताण न येता त्यातून आनंद कसा मिळेल ?’, याकडे श्रीगुरूंचे सतत लक्ष असणे : लिखाणाला जोडायची अध्यात्मशास्त्रीय सूत्रे सुटसुटीत आणि सोप्या भाषेत लिहिल्यास ती वाचकांना समजायला सोपी जातात. ‘लिखाणात कठीण शब्दांचा उपयोग करणे टाळणे, इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ कंसात देणे, वाक्ये लहान, सोपी आणि अर्थपूर्ण लिहिणे, व्याकरण शुद्ध असावे’, अशा अनेक गोष्टी श्रीगुरूंनी अतिशय प्रेमाने शिकवल्या. यातून ‘ते वाचकांचा किती विचार करतात ?’, तसेच ‘साधकाला सेवेचा ताण न येता त्यातून आनंद कसा मिळेल ? त्याला नवनवीन सूत्रे कशी शिकता येतील ?’ याकडे त्यांचे सतत लक्ष असते. एखादा लेख आवडला की, ते कौतुक करून साधकाला प्रोत्साहन देतात, प्रसादही पाठवतात. त्यामुळे साधकाचा सेवा करण्याचा उत्साह वाढतो. तसेच ‘ही सेवा अजून परिपूर्ण आणि भावपूर्ण कशी करू ?’, अशी तळमळ साधकात निर्माण होते’, हे मी अनेकदा अनुभवले आहे.

१ इ. श्रीगुरूंच्या कृपेने साधिका सूक्ष्म-परीक्षण करण्यास शिकणे : ‘गत २ वर्षांपासून दैनिकात प्रसिद्ध होत असलेले संशोधनात्मक लेख वैशिष्ट्यपूर्ण आहेत’, असे अनेक जणांनी कळवले. ‘आम्ही तुमचे सूक्ष्म-परीक्षण नेहमी वाचतो. ते खूप सोपे आणि सुटसुटीत असते’, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले; कारण मला तर सूक्ष्म-परीक्षण करता येत नाही. दैनिकात प्रसिद्ध होणारे काही लेख वाचकांच्या दृष्टीने वाचण्यास मी आरंभ केले, तेव्हा मला याचा उलगडा झाला की, माझ्या नकळत श्रीगुरूंनी मला सूक्ष्म-परीक्षण करण्यास शिकवले, यासाठी श्रीगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार चालू ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या लेखांना मिळालेला प्रतिसाद !

 १. ‘नामजप करत बनवलेला स्वयंपाक सात्त्विक अन् रुचकर बनतो’, हे अनुभवणे : एका गृहिणीने सांगितले की, आपण प्रतिदिन बाजारातून भाजी आणतो. ती पाण्याने स्वच्छ करून चिरतो आणि बनवतो. या सर्व कृती करतांना त्या योग्य प्रकारे केल्यास त्रासदायक स्पंदनांपासून आपले रक्षण होते. हे आहाराशी संबंधित विविध लेख वाचतांना मला लक्षात आले. आता मी भाजी विकत आणल्यावर ती विभूतीच्या पाण्याने धुऊन घेते. त्यानंतर योग्य पद्धतीने आणि नामजप करत ती चिरते. त्यामुळे मला चांगले वाटते. ‘नामजप करत बनवलेला स्वयंपाक सात्त्विक अन् रुचकर बनतो’, हे मी अनुभवले.’

२. धार्मिक कृती, शांतीविधी, यज्ञयाग, होमहवन यांचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येणे : एका जिज्ञासूने सांगितले, ‘आमच्याकडे विविध प्रसंगी विविध धार्मिक कृती, शांतीविधी, यज्ञयाग, होमहवन इत्यादी केले जाते. या गोष्टी परंपरेनुसार चालत आलेल्या असल्याने आम्ही त्या करत असतो; पण ‘त्यातून आम्हाला सात्त्विकता कशी ग्रहण करता येते ?’, हे लेख वाचून शिकायला मिळाले. त्यामुळे या कृती भावपूर्ण करण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यातून मनाला प्रसन्नता जाणवते. आपल्या महान ऋषीमुनींप्रती कृतज्ञता वाटते.’

३. देवपूजा करतांना ती भावपूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात येणे : एका हितचिंतकाने सांगितले की, पूर्वी ते घाईगडबडीत पूजा उरकत असत. त्यामुळे त्यांना त्यातून आनंद मिळत नसे. देवपूजेशी संबंधित संशोधनात्मक लेख वाचून भावपूर्ण पूजेचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसले. आता ते पूजा भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. यातून त्यांना चैतन्य आणि आत्मिक समाधान मिळते. तसेच देवाविषयी भाव निर्माण होण्यासही साहाय्य झाले.


२. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधनात्मक लेखांना वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद !

२ अ. लेख वाचून त्यात दिलेल्या सूत्रांनुसार जीवनशैलीत सकारात्मक पालट करण्याची प्रेरणा मिळणे : अनेक वाचकांनी कळवले की, लेख खूप अभ्यासपूर्ण आणि कृतीप्रवण करणारे असतात, उदा. कुंकू लावणे, सात्त्विक पोशाख परिधान करणे, सात्त्विक आहार ग्रहण करणे, या विषयांवरील संशोधनात्मक लेख वाचून ‘या कृती केल्याने आपल्या ‘ऑरा’वर कसा सकारात्मक परिणाम होतो ?’, हे लक्षात येऊन तशी कृती करण्यास आरंभ केले. एका वाचकांनी कळवले, ‘मला पूर्वी काळे कपडे परिधान करायला आवडत असे. आपला लेख वाचून ‘काळे कपडे परिधान करण्यापेक्षा सात्त्विक रंगाचे कपडे परिधान करणे का आवश्यक आहे ?’, हे लक्षात आले. आता मी शक्यतो सात्त्विक रंगाचे कपडेच परिधान करतो. त्यामुळे माझ्या मनाला चांगले वाटते.’ एका वाचकांनी सांगितले की, ‘आपण तुपाचा दिवा घरात प्रतिदिन लावतो; पण त्याचे आध्यात्मिक महत्त्व आपला लेख वाचल्यावर लक्षात आले. त्यामुळे आता माझ्याकडून ती कृती भावपूर्ण होते.’

२ आ. ‘कोणतीही वस्तू विकत घेतांना ती कशी निवडावी ?’, हे लक्षात येणे : एक वाचक म्हणाले ,‘‘आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तूंचा उपयोग करतो. तसेच विविध प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू बाजारातून विकत आणतो. हे करत असतांना ‘वस्तुने आकर्षक असण्यासह सात्त्विक असणे किती आवश्यक आहे ?’, हे विविध लेखांतून शिकायला मिळाले, उदा. ‘कपड्यांवरील नक्षी सुटसुटीत आणि सात्त्विक असावी’, ‘कृत्रिम धाग्यांपेक्षा नैसर्गिक धाग्यांपासून बनलेले कपडे वापरणे हितकारी आहे’, ‘अलंकार विकत घेतांना त्याची नक्षी सात्त्विक असावी’ इत्यादी. त्यामुळे दुकानात खरेदीसाठी जातांना या सूत्रांचा विचार करून वस्तूंची निवड केली जाते.’’

२ इ. संशोधनात्मक लेखांतून साधनेचे महत्त्व लक्षात येणे : काही वाचकांनी सांगितले की, आपल्या संशोधनात्मक लेखांचा विषय कोणताही असो; पण तो साधना करण्यास उद्युक्त करतो. आम्हाला जमेल तशी साधना करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यातून आम्हाला आनंद मिळतो. काही जिज्ञासू त्यांना साधनेविषयी काही शंका असल्यास त्यांचे निरसन करून घेतात.

२ ई. आध्यात्मिक संशोधनाचा जगभर प्रसार व्हावा, अशी तळमळ असलेले वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू ! : ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणारे आध्यात्मिक संशोधन पाहून अनेक वाचक आणि जिज्ञासू प्रभावित होतात आणि सांगतात की, ‘आपले संशोधन अप्रतिम आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते जगभर पोचायला हवे. तुम्ही आम्हाला या संशोधनात्मक लेखांच्या ‘लिंक’ (संकेतस्थळाची मार्गिका) पाठवा. आम्ही आमचे नातेवाईक, परिचित, मित्र-परिवार यांना हे लेख वाचण्यासाठी पाठवू.’

काही जिज्ञासू ‘संशोधनाचे विविध विषय, तसेच संशोधन अजून चांगले होण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो ?’, अशी सूत्रेही आवर्जून सुचवतात.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणार्‍या आध्यात्मिक संशोधनाला वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांच्याकडून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून श्रीगुरूंनी ‘आध्यात्मिक संशोधन’ हे सुंदर माध्यम आम्हाला सेवेसाठी उपलब्ध करून दिले, यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. या सेवेतून आम्हा सर्व साधकांची आणि वाचक, जिज्ञासू अन् हितचिंतक यांची आध्यात्मिक उन्नती होवो, हीच श्रीगुरूंच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२४)