श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनुभवलेली ‘सनातन प्रभात’ची लोकप्रियता !

श्रीक्षेत्र अयोध्या धाम येथे २२ जानेवारी २०२४ या दिवशी नवीन श्रीराममंदिरात श्री रामलल्लांचा झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा, हा या भूतलावरील ‘न भुतो, न भविष्यति’, असा होता.  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने या सोहळ्याचे प्रत्यक्ष वार्तांकन करण्याची संधी मी आणि मुंबई येथील वार्ताहर साधक श्री. प्रीतम नाचणकर यांना मिळाली. या कालावधीत ‘सनातन प्रभात’च्या लोकप्रियतेचा आलेला अनुभव येथे देत आहे.

संकलक : श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

अयोध्येतील राममंदिर

१. संतांना ‘सनातन प्रभात’विषयी असलेली आपुलकी !

१ अ. सांगली येथील संत प.पू. ईश्वरबुवा रामदासी यांना ‘सनातन प्रभात’ अयोध्येमध्येही असल्याचे पाहून फार आनंद होणे : ‘सनातन प्रभात’ हे संतांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असलेले एकमेवाद्वितीय नियतकालिक आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला अयोध्येत आली. आम्ही अयोध्येतील प्रसिद्ध लता चौकात वार्तांकनासाठी गेलो असतांना तेथे सांगली येथील संत प.पू. ईश्वरबुवा रामदासी हे आम्हाला अचानक भेटले. यापूर्वी मी त्यांना कधी प्रत्यक्ष पाहिले नव्हते. तरीही त्यांचा पोषाख पाहून ‘ते महाराष्ट्रातील आहेत’, हे सहज लक्षात आले. आम्ही त्यांच्याशी जाऊन बोललो. त्या वेळी माझ्या हातात ‘सनातन प्रभात’चा ‘माईक’ होता. तो ‘माईक’ पाहूनच त्यांना ‘आम्ही सनातनचे आहोत’ हे कळले आणि त्यांना पुष्कळ आनंद झाला. ते अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाले ‘‘अरे वा, ‘सनातन प्रभात’ इकडेपण आहे. फार छान.’’ यानंतर त्यांनी त्यांची ओळख सांगितल्यावर ‘हे संत तर आपल्या फार जवळचे आहेत’, असा विचार येऊन फार आनंद झाला. ‘सनातन प्रभात’मध्ये आतापर्यंत प्रसिद्ध झालेले त्यांचे आशीर्वाद, प्रतिक्रिया, बातम्या आदी सर्व डोळ्यांसमोरून एका क्षणात सरकले आणि त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता अन् आपुलकी वाटली.

प.पू. ईश्वरबुवा रामदासी यांच्यासमवेत त्यांचे काही भक्तही होते. यानंतर आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतली. या वेळी त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष कारसेवेचा अनुभव सांगतांना त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू तरळले, तर मनात श्रीराममंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा कृतार्थ भाव होता !

जगद्गुरु महंत परमहंसाचार्यजी महाराज

१ आ. अयोध्येतील तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु महंत परमहंसाचार्यजी महाराज यांनी ‘सनातन प्रभात’चा माईक पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देणे : एकदा अयोध्येतील ‘राम की पैडी’ या भागात वार्तांकन करत असतांना आमची अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत पीठाधीश्वर जगद्गुरु महंत परमहंसाचार्यजी महाराज यांच्याशी भेट झाली. तेव्हा माझ्या हातातील ‘सनातन प्रभात’चा ‘माईक’ पहाताच ते उत्स्फूर्तपणे ‘सनातन प्रभात ! मी तुम्हाला (‘सनातन प्रभात’ला) चांगला ओळखतो’, असे म्हणाले. यासह त्यांनी काही साधकांची ओळख सांगितली. या वेळी अन्य काही वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबले होते. आम्हीही त्यांची प्रतिक्रिया घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतःहून ‘मला केवळ ‘सनातन प्रभात’साठी विशेष प्रतिक्रिया द्यायची आहे’, असे सांगून ती दिली. यानंतर त्यांनी पुन्हा ‘मला जनतेला आणखी एक आवाहन करायचे आहे’, असे सांगून ‘कॅमेरा’ चालू करण्यास सांगितले. त्या वेळी त्यांनी ‘सर्वांनी ‘सनातन प्रभात’ची ‘यू ट्यूब’ वाहिनी आवर्जून पहावी’, असे आवाहन केले.


सर्वसामान्य लोकांनी ‘आम्हाला ‘सनातन प्रभात’ ठाऊक आहे’, असे आवर्जून सांगणे

रामभक्तांचे मनोगत जाणून घेतांना श्री. नीलेश कुलकर्णी

आम्ही अनेक संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्या वेळी आम्हाला असे अनेक लोक भेटले की, जे ‘सनातन प्रभात’चा ‘माईक’ बघून आमच्याकडे आले आणि ‘आम्हाला ‘सनातन प्रभात’ ठाऊक आहे’, असे त्यांनी आपुलकीने सांगितले. या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर ‘आपलेच कुणीतरी भेटले आहे’, असा भाव दिसत होता.


२. एका पुरोहितानेही ‘सनातन प्रभात’चा ‘माईक’ पाहून स्वतःहून उत्स्फूर्तपणे महत्त्वाची बातमी देणे

२२ जानेवारीला श्री रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सर्व पत्रकारांसाठी मंदिरात दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तेव्हा एक पुरोहित ‘सनातन प्रभात’चा ‘माईक’ पाहून एवढ्या प्रचंड गर्दीतही स्वतःहून आमच्याशी बोलायला आले आणि ‘मला ‘सनातन प्रभात’ चांगलेच ठाऊक आहे’, असे त्यांनी सांगितले. यानंतर आम्ही त्यांच्याशी ओळख करून घेतली, तेव्हा त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी जे विधी झाले, त्यात ते सहभागी असल्याचे सांगितले. त्या विधींच्या वेळी काय काय झाले ? ते कसे पार पडले ?’ या गोष्टी आमच्यासाठी बातमी होती. तेव्हा आम्ही मंदिरातच त्यांची विशेष प्रतिक्रिया घेतली.

३. अधिवक्ता मदन मोहन यादव यांचा ‘सनातन प्रभात’प्रती असलेला विलक्षण भाव !

श्री. नीलेश कुलकर्णी

आम्ही अयोध्येहून वाराणसी येथे गेलो. तेव्हा वाराणसीतील न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी चालू होती. त्या सुनावणीत ज्ञानवापीतील गर्भगृहात हिंदूंना पूजेचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. आम्ही तेथे जाऊन वार्तांकन करण्याचे ठरवले; परंतु प्रांत वेगळा, कुणीही ओळखीचे नाही, कुठले अधिवक्ता कुठे बसतात ? हे ठाऊक नव्हते. एका साधकाने आम्हाला ‘अधिवक्ता मदन मोहन यादव यांना भेटू शकता’, असे सांगितले. त्यांना भेटायचे ठरवून आम्ही न्यायालय गाठले. ‘एवढ्या गर्दीत त्यांना ओळखायचे कसे ?’,

हा प्रश्नच होता. त्यांनी ‘सर्व अधिवक्त्यांमध्ये ज्याने काळ्या कोटासह डोक्यावर वारकर्‍यांप्रमाणे पांढरी टोपी घातली आहे, तोच मी’, अशी स्वतःची ओळख सांगितली आणि आम्हाला ते लगेचच ओळखता आले. त्यांनी ‘मी संत ज्ञानेश्वरांचा भक्त असल्याने पांढरी टोपी घालतो’, असे सांगितले. त्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी आणखी जवळीक वाटली. त्यांना ‘सनातन प्रभात’विषयी ठाऊक होतेच. त्यात त्यांना ‘सनातन प्रभात’चे यू ट्यूब चॅनल असून आम्ही या सुनावणीच्या वार्तांकनासाठी एवढ्या लांब आलो आहोत’, याचे पुष्कळ कौतुक वाटले. त्यांच्या चेहर्‍यावर ‘सनातन’प्रती विलक्षण भाव दिसून येत होता. त्यामुळे लगेचच आमचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. त्यांनी संपूर्ण सुनावणी होईपर्यंत आम्हाला बातमीसाठी लागेल ते सर्व साहाय्य केले. यात वरिष्ठ अधिवक्त्यांच्या ओळखी करून देणे, विविध स्थानिक पत्रकारांच्या ओळखी करून देणे, हिंदुत्वनिष्ठांची भेट घालून देणे, एवढेच नव्हे, तर बातमीतील बारकावे सांगणे, असे त्यांनी आनंदाने केले. वस्तूतः अधिवक्ता मदन मोहन यादव हे ज्ञानवापी प्रकरणात हिंदूंची बाजू तळमळीने मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ता आहेत, तरीही त्यांनी त्या महत्त्वाच्या दिवशी पूर्णवेळ आमच्यासमवेत थांबून आम्हाला बातमीसाठी सर्वतोपरी साहाय्य केले. त्यामुळे हिंदूंच्या विजयाची बातमी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रसारित करू शकलो !

४. कृतज्ञता

‘सनातन प्रभात’चे नाव ऐकून किंवा ‘माईक’ पाहून वरील सर्वांना जो आनंद झाला, त्यावरून ‘सनातन प्रभात’ या नावातच सामर्थ्य असल्याचे जाणवले आणि ‘आपण काहीही करू शकत नाही, सर्व सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने होत आहे’, हे जाणवले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनीच आम्हाला या अविस्मरणीय सेवेची संधी दिली आणि त्यांनी ती करवूनही घेतली, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !


नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदासजी महाराज यांनीही ‘सनातन प्रभात’च्या ‘यू ट्यूब’ चॅनलचे कौतुक करणे

नाशिक येथील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदासजी महाराज हेही आम्हाला श्रीराममंदिराच्या प्रवेशद्वारावरच भेटले. त्यांना आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेण्याविषयी विचारले असता, त्यांनी ‘सनातन प्रभात’च्या ‘यू ट्यूब’ चॅनलचे कौतुक केले.

– श्री. नीलेश कुलकर्णी


विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘सनातन प्रभात’विषयी आपुलकी दर्शवणे

अयोध्येला देशभरातून विविध पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, कॅमेरामॅन आदी आले होते. तेथील ‘मिडिया सेंटर’मध्ये आमची अनेक पत्रकार, छायाचित्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आदींशी ओळख झाली. त्यांतील अनेक जणांनी ‘आम्हाला ‘सनातन प्रभात’ ठाऊक आहे’, असे सांगितले, तर काही जणांनी जिज्ञासेने ‘सनातन प्रभात’विषयी आमच्याकडून जाणून घेतले. महाराष्ट्र राज्यातील काही मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या पत्रकारांनी ‘सनातन प्रभात’चा माईक पहाताच ‘सनातन प्रभात’ अयोध्येलापण पोचले. चांगले आहे. ‘यू ट्यूब’ वाहिनी चालू करणे, ही काळाची आवश्यकता आहे’, अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केली. आश्चर्याचा सुखद धक्का बसावा, अशी त्यांची ही बोलकी प्रतिक्रिया होती. अनेक पत्रकारांनी सनातनच्या अनेक साधकांची नावे सांगून ते त्यांना ओळखत असल्याचेही सांगितले. त्या सर्वांमध्ये ‘सनातन प्रभात’विषयी आपुलकी असल्याचेही दिसून आले.

‘मिडिया सेंटर’मध्ये आम्ही बातमीचे टंकलेखन करत होतो, तेव्हा उत्तरप्रदेश राज्यातील एक पत्रकार आमच्याकडे आले आणि स्वतःहून आमची ओळख करून घेतली. या वेळी ते म्हणाले, ‘‘मी लांबून तुम्हाला पहात होतो. तुम्हाला पाहिल्यावर आणि तुमचा पोषाख पाहिल्यावर ‘तुम्ही वेगळे आहात’, असे मला जाणवले आणि  म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलो.’’

– श्री. नीलेश कुलकर्णी