‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य !

 दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पहिल्या (गोवा आणि सिंधुदुर्ग) आवृत्तीला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. एखाद्या नियतकालिकाने हा टप्पा यशस्वीरित्या गाठण्याला मैलाचा दगड मानता येईल; मात्र सध्याची जागतिक रहाटी पहाता या उपलब्धीकडे अधिक विशेषत्वाने पहावयास हवे. याचे कारण असे की, सध्याचा काळ हा ‘ऑनलाईन’ जगताचा आहे. गेल्या एक-दीड दशकात वार्तांकन करणे, बातम्यांचा प्रसार करणे यांच्या पद्धतींत आमूलाग्र पालट झाले आहेत. एकेकाळी उद्याच्या दैनिकात बातमी येईपर्यंत त्या बातमीची फारशी चर्चा नसे. २ दशकापूर्वीच्या काळावर दृष्टीक्षेप टाकल्यास आपल्याला लक्षात येईल की, ‘आकाशवाणी’, ‘दूरदर्शन’ आणि बोटावर मोजण्याइतपत अन्य काही वृत्तवाहिन्या सोडल्या, तर बातम्या समजण्यासाठी वर्तमानपत्रे हेच महत्त्वपूर्ण अथवा प्राथमिक माध्यम होते. आज मात्र एखादी बातमी एखाद्या वृत्तवाहिनीवर प्रसारित होण्यापूर्वीच ‘एक्स’, ‘टेलीग्राम’, ‘फेसबुक’ आदी सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) ती आधी प्रसारित होते आणि त्यानंतर काही मिनिटांत/घंट्यांत वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळे अन् वृत्तवाहिन्या यांवर झळकते. ‘सोशल मिडिया’च्या या जगतात वर्तमानपत्रांविषयी बोलण्याची त्यामुळे काही सोय राहिलेली नाही. व्यावसायिक पत्रकारिता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे यांच्या धामधुमीत दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव त्यामुळेच अधिक विशेष आहे.

आज पारंपरिक पद्धतीने वर्तमानपत्रांचे वाचन करण्याची संस्कृती तशी लोप पावत चालली आहे. ‘ज्येष्ठ नागरिकांपुरती आता ती शिल्लक राहिली आहे ’, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे वर्तमानपत्रांना अथवा ‘मिडिया हाऊसेस’ना तग धरण्यासाठी या नव्या चालीरिती (सामाजिक माध्यमे) आत्मसात करणे अपरिहार्य झाले आहे. त्यात ‘सनातन प्रभात’चा विचार केला, तर ‘हिंदु राष्ट्र’ ही दैवी संकल्पना साकार करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ने आरंभलेले प्रबोधनाचे कार्य आज त्याच निर्धाराने ‘ऑनलाईन’ प्रसारित होणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीकोनातून ‘सनातन प्रभात’कडून चालू असलेल्या प्रयत्नांचा मागोवा आणि पुढील दिशा सांगण्यासाठीचा हा प्रयत्न !

‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ www.SanatanPrabhat.org !

१ अ. प्रारंभ : वर नमूद केल्यानुसार ‘सनातन प्रभात’ची स्थापना झाल्यापासून प्रारंभीची काही वर्षे त्यातील बातम्या ऑनलाईन प्रसारित करण्यासाठी ‘ब्लॉग’चा उपयोग केला जात असे. डिसेंबर २०१६ मध्ये ‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ www.SanatanPrabhat.org याचा शुभारंभ झाला. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके ज्या प्रकारे मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांत आहेत, त्यांनुसार या चारही भाषांमध्ये हे संकेतस्थळ पहिल्या दिवसापासून कार्यान्वित झाले. संकेतस्थळाला साधारण साडेसात वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत ‘सनातन प्रभात’ संकेतस्थळाचे कार्य गतीने वाढले.

१ आ. संकेतस्थळाचे वैशिष्ट्य : ‘सनातन प्रभात’ संकेतस्थळावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्यांसह महाराष्ट्र अन् गोवा राज्यांतील स्थानिक बातम्याही प्रसारित केल्या जातात. यांसह ‘सनातन प्रभात’चे संपादकीय, प्रसिद्ध लेखकांचे लेख आदीही प्रकाशित होतात. नियतकालिकात जागेची मर्यादा असली, तरी संकेतस्थळावर ती नसल्याने बातम्या, लेख यांसह संबंधित छायाचित्रे, ट्वीट्स आणि व्हिडिओ आदी प्रसारित केल्याने तो विषय अधिक चांगल्या प्रकारे वाचकाला समजतो.

या एकमेवाद्वितीय संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असे की, याची सेवा करणारे सर्वजण साधकच असून ते विविध शहरांत, राज्यांत नि देशांत विखुरलेले आहेत; पण प्रतिदिन ते ही सेवा तळमळीने करतात.

‘यू ट्यूब’द्वारे मोठ्या प्रमाणात प्रसार

सध्या व्हिडिओ (ध्वनीचित्रीकरण) हे विचार प्रसृत करण्याचे एक प्रभावी आणि लोकांना खिळवून ठेवण्याचे प्रचलित माध्यम झाले आहे. ‘सनातन प्रभात’ही गेल्या काही वर्षांपासून व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूंवरील अन्याय-अत्याचार यांविषयीची वृत्ते व्हिडिओतून ‘सनातन प्रभात’ लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते. यासह हिंदूसंघटनाचे विविध ठिकाणी होत असलेले प्रयत्न, विविध क्षेत्री असलेल्या हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा, हिंदुत्वरक्षणासाठी हिंदूंनी केलेले प्रयत्न, दिनविशेष, हिंदूंचे वैचारिक प्रबोधन आदींचे व्हिडिओ ‘सनातन प्रभात’च्या अधिकृत ‘यू ट्यूब’ चॅनलवरून आतापर्यंत प्रसारित करण्यात आले आहेत.


डेली हंट

सहस्रावधी ॲपच्या गर्दीत ‘डेली हंट’ न्यूज ॲप हे सध्या सर्वांत प्रचलित ॲप्सपैकी एक झाले आहे. ‘युनिकॉर्न’ आस्थापन (एखाद्या नव्या आस्थापनाचे मूल्य काही वर्षांतच १ बिलियन डॉलर म्हणजे ८०० कोटी रुपयांहून अधिक होणे) झालेल्या या ॲपचा २० कोटींहून अधिक लोक वापर करत आहेत. या ॲपवर ३ सहस्रांहून अधिक महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल्स (वृत्त संकेतस्थळे) आदींची खाती आहेत. यामुळे वाचकाला एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात. या ॲपवर ‘सनातन प्रभात’ची मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी ही ४ खाती असून त्या माध्यमातून प्रतिदिन सहस्रावधी लोकांपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’मधील विचार पोचत आहेत.

‘सनातन प्रभात’चा सामाजिक माध्यमांतून प्रसार !

अ. ‘एक्स’ (ट्विटर) : कोणत्याही विचाराचा प्रसार करण्यासाठी आज ‘एक्स’ हे सर्वाेत्तम माध्यम समजले जाते. ‘सनातन प्रभात’ही हिंदु राष्ट्राचा प्रभावी प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा प्रतिदिन उपयोग करते. हिंदूंवरील आघातांची वृत्ते आणि लेख आदींचा प्रसार या माध्यमातून केला जात आहे. या माध्यमातून अनेक संघटना, तज्ञ मंडळी, राजकारणी, सरकारी अधिकारी आदी ‘एक्स’च्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’शी जोडले गेले आहेत. ‘एक्स’वर ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन प्रभात कन्नड’, अशी २ खाती आहेत.

आ. टेलीग्राम : विदेशात या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. काही ठिकाणी सरकारी धोरणे सांगण्यासाठी याचा वापर प्राधान्याने केला जातो. ‘सनातन प्रभात’चीसुद्धा टेलीग्रामवर ४ भाषांतील ४ खाती असून त्या माध्यमातून प्रतिदिनच्या बातम्यांचे त्या-त्या भाषेतील बुलेटिन प्रसारित केले जाते.

इ. व्हॉट्सॲप : ‘व्हॉट्सॲप हा आजच्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे’, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. या माध्यमातून प्रतिदिन सनातन प्रभातकडून केले जाणारे लिखाण लाखो लोकांपर्यंत पोचवले जाते.

ई. फेसबुक आणि इन्स्टाग्राम : ‘सनातन प्रभात’वर निराधार आरोप करणार्‍या काही हिंदुद्वेष्ट्या मंडळींमुळे मुळातच साम्यवाद्यांच्या हातचे बाहुले झालेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांवरून धर्मप्रसार करण्यास ‘सनातन प्रभात’ला मर्यादा आल्या आहेत. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना ज्या प्रकारे या डाव्या नि उदारमतवादी पाश्चात्त्यांच्या षड्यंत्राच्या बळी ठरल्या आहेत, त्यात ‘सनातन प्रभात’चे नावही आहे. अर्थात् हीच तर ‘सनातन प्रभात’च्या हिंदुत्व आणि राष्ट्रनिष्ठ कार्याची अद्वितीय पोचपावती आहे, असे म्हणता येईल.

उ. ‘इव्हनिंग इन्साईट’चा प्रारंभ : ‘सनातन प्रभात’कडून महत्त्वपूर्ण घडामोडी आणि त्यांवरील संपादकीय टिपण्या प्रतिदिन रात्री इंग्रजी भाषेत प्रसारित केल्या जातात. ‘इव्हिनिंग इन्साईट’ (Evening Insight) असे या बुलेटिनचे नाव असून त्याच्या नावाप्रमाणे कोणत्याही घटनेमागील मूळ हेतूवर प्रकाश टाकण्याचा यातून प्रयत्न केला जातो. दुसर्‍या शब्दात सांगायचे, तर ‘Experience the change in reading news. Visit daily to get ‘Bharatiya’ & ‘Hindu’ Editorial viewpoints !’ हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. याचा अर्थ – ‘बातम्या वाचण्यातील वेगळेपण अनुभवा. ‘भारतीय’ आणि ‘हिंदु’ दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी प्रतिदिन भेट द्या : SanatanPrabhat.org’, थोडक्यात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून दिले जाणारे संपादकीय दृष्टीकोन आधुनिक इंग्रजी भाषेत ऑनलाईनच्या माध्यमातून त्वरित देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. ‘इव्हिनिंग इन्साईट’द्वारे सरासरी १० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्यांवर नेमक्या शब्दांत संपादकीय दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ई. मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषांद्वारे प्रसार : ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा विचार करता दैनिक केवळ मराठी भाषेत आहे. कन्नड भाषेत साप्ताहिक आहे आणि हिंदी अन् इंग्रजी भाषांत पाक्षिक आहे. असे असले, तरी प्रतिदिन घडणार्‍या महत्त्वपूर्ण घडामोडी कन्नड, हिंदी आणि इंग्रजी या भाषांत संकेतस्थळाद्वारे प्रतिदिन प्रसारित केल्या जातात. यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन विविध भाषांत प्रतिदिन देशभरातील लोकांपर्यंत जात आहेत. या एकमेवाद्वितीय संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असे की, याची सेवा करणारे सर्वजण साधकच असून ते विविध शहरांत, राज्यांत नि देशांत विखुरलेले आहेत; पण प्रतिदिन ते ही सेवा तळमळीने करतात.

 ‘सनातन प्रभात’चे व्हिडिओ पाहून समाजातील लोकांचे उत्स्फूर्त अभिप्राय !

अ. संभाजी महाराजांविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली ! – एक व्यक्ती (संभाजी महाराजांवर बनवण्यात आलेला व्हिडिओ)

आ. ‘सनातन प्रभात’, आभारी आहे. हिंदूंनी जागे होण्याची आवश्यकता ! – धनंजय चितंबर (स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहिलेल्या कोल्हापूर येथील लोकांच्या अभिप्रायाचा व्हिडिओ)

इ. ‘सनातन प्रभात’कडून कौतुकास्पद वार्तांकन होत असून आमचे धन्यवाद ! – झारखंड येथील ‘रिलिजियस सर्व्हिस’ नावाचे खाते (वाराणसी येथील ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याची माहिती देणारा व्हिडिओ)

ई. ‘सनातन प्रभात’च्या निर्भीड पत्रकारितेसाठी पुष्कळ धन्यवाद ! – निलांजना भानुशाली (पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा भ्रष्टाचार उघड करणारा व्हिडिओ)

उ. ज्या-ज्या मराठी वाहिन्या हे दाखवत नाहीत, त्या वाहिन्या पाहूच नका ! – सुनीता निंबाळकर (नगर येथे ख्रिस्ती पास्टरने केलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीवरील अत्याचाराच्या बातमीचा व्हिडिओ)