संपादकीय : आत्मोद्धाराकडून राष्ट्रोद्धाराकडे !

आजच्या काळात मानवाच्या सर्वांगीण उद्धारासमवेत राष्ट्रोद्धारासाठी अत्यंत तत्त्वनिष्ठ पत्रकारिता करणारे ‘सनातन प्रभात’विना दुसरे उदाहरण क्वचित्च असेल ! लोकमान्य टिळक यांच्या पत्रकारितेचा आदर्श घेऊन चालू झालेले दैनिक ‘सनातन प्रभात’ देशाचे शत्रू असलेले तथाकथित निधर्मी, साम्यवादी, पुरोगामी, धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही आदींच्या विरोधातील ‘असंतोषाचे जनक’ ठरले आहे ! धर्मनिष्ठा, प्रखर देशभक्ती, कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार या वैशिष्ट्यांशी यत्किंचितही तडजोड न केल्याने ‘सनातन प्रभात’ची लेखणी आज तिच्या अंगभूत तेजाने तळपत आहे ! व्यावसायिकतेतील तडजोडीसाठी येणारी विज्ञापने आणि लिखाण अन् लोकांना आवडणारे मनोरजन यांना पूर्णतः दूर ठेवून राष्ट्र धगधगत असतांना त्याला निर्णायक दिशादर्शन करण्यासाठी, आत्मबल वाढवून राष्ट्रबळ वाढवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे ध्येय घेऊन ‘सनातन प्रभात’ची झरणी गेली २५ वर्षे अखंड झिरपत आहे….!

सात्त्विकतेचा प्रसार !

‘व्यावसायिकता’ हा हेतूच नसल्यामुळे अन्य वृत्तपत्रे आणि ‘सनातन प्रभात’मध्ये मूलतः भेद राहिला. केवळ राष्ट्र आणि धर्म या विषयांना प्राधान्य देणारे हे दैनिक छोटीशी जागाही वाया जाऊ नये, याची काळजी घेते. सात्त्विकता निर्माण होण्यासाठी आणि जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे, हे ‘सनातन प्रभात’चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘जेवढे सात्त्विक तेवढे परिणामकारक’, हे शास्त्र आहे. जेवढे शुद्ध तेवढे सात्त्विक ! ही शुद्धता आणि सात्त्विकता वाढवण्यासाठी दैनिकात मराठी शब्दांचा वापर, शुद्धलेखन, व्याकरण यांनुसार चांगल्या प्रकारे पडताळणे, द्विरुक्ती टाळणे, सात्त्विक रचना करणे, रज-तमात्मक छायाचित्रे किंवा चित्रे न वापरणे, प्रत्येक छायाचित्र, रचना, लिखाण अधिकाधिक सात्त्विक करणे, असे केले जाते. वैयक्तिक जीवनाचे अध्यात्मीकीकरण करून ते सात्त्विक आणि पर्यायाने नैतिक बनवले की, समाजिक आणि राष्ट्रीय जीवन हे आपोआपच आदर्श बनते. हा ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकीकरणाचा गाभा आणि हेतू आहे.

‘हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ हा छत्रपती शिवरायांच्या आदर्श राज्यकारभाराचा सारांश आत्मसात करून कार्यरत असणार्‍या, ‘देहाकडून देवाकडे जातांना वाटेत देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो’ या स्वातंत्र्यविरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन वाटचाल करणार्‍या ‘सनातन प्रभात’चे आदर्श रामराज्याचे, म्हणजेच हिंदु राष्ट्राचे ध्येय हे किती परिष्कृत (शुद्ध) असेल, याची कल्पना येईल. अत्यंत निःस्वार्थी आणि निर्माेही हेतूने केवळ समाजाला राष्ट्र आणि धर्म प्रेरणांनी जागृत करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ गेली २५ वर्षे ध्येयप्राप्तीच्या दिशेने घोडदौड करत आहे. अर्थ, काम आणि निधर्मीपणा यांनी समाजाची झालेली बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी, म्हणजेच धर्म आणि राष्ट्र यांचे अधिष्ठान ठेवण्यास प्रवृत्त करण्यासाठी ते कार्यरत आहे.

हिंदुत्वनिष्ठांच्या गळ्यातील ताईत !

गेली २५ वर्षे हिंदुत्वावरील आघातांना वाचा फोडण्याचे महत्कार्य हेच हिंदु राष्ट्राच्या कार्यातील ‘सनातन प्रभात’चे हे सर्वांत महत्त्वाचे योगदान आहे. आज ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असे बहुसंख्यांकांना वाटत आहे आणि त्याचा वारंवार उच्चार होत आहे. २५ वर्षांपूर्वी जेव्हा हा शब्द उच्चारणे मोठे धारिष्ट्याचे होते, त्या काँग्रेसच्या राज्यात ‘ईश्वरी राज्या’च्या स्थापनेचे, म्हणजेच रामराज्याचे ध्येय घेऊन या वृत्तपत्राची स्थापना झाली. निधर्मी सरकारच्या काळात ‘सनातन प्रभात’वर अनेकांनी वक्रदृष्टी ठेवूनही ते त्यातून ताऊन सुलाखून निघाले. असंख्य वृत्तवाहिन्यांपैकी एकही लव्ह जिहादविषयी बोलत नव्हती, त्याही आधीपासून म्हणजे १८ वर्षांपूर्वीपासून ‘सनातन प्रभात’ आठवड्याला ८ तरी लव्ह जिहादची वृत्ते देत आले आहे. लव्ह जिहादचे पुरावे मागणार्‍यांसाठी ही मोठी चपराक आहे. ‘दोन गटांत’ हा शब्द ‘सनातन प्रभात’ने कधीही वापरला नाही. ‘सनातन प्रभात’च्या मिरज येथील कार्यालयावर धर्मांधांनी आक्रमण करूनही ‘हिंदु आणि धर्मांध यांच्यातील दंगल’ असे लिहिण्यास ‘सनातन प्रभात’ कधीही कचरले नाही; कारण ते ईश्वरनिष्ठ असल्याने त्याला अन्य कुणाचे भय नाही ! सडेतोडपणा, हिंदुत्वहिताची प्रखर आणि अत्यंत सुस्पष्ट दिशा, हेच केवळ ‘सनातन प्रभात’चे विशेषत्व नाही, तर वाचकांना दुविधेत, संभ्रमात किंवा अनुत्तरीत न ठेवता ‘ठोस उपाययोजनात्मक दिशादर्शन’ हे ‘सनातन प्रभात’च्या वृत्तांमधील संपादकीय टीपा किंवा अग्रलेख यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

हिंदु राष्ट्राचे ध्येय कसे साध्य होणार ?

धर्मांतर, गोहत्या, भ्रष्टाचार, बलात्कार, खून, दरोडे, सर्व प्रकारचे जिहाद, आतंकवाद, नक्षलवाद, गरिबी, लोकसंख्यावाढ, संरक्षण आदी राष्ट्रासमोरील सर्वच प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र !’ हिंदु राष्ट्र हे धर्माधिष्ठित पर्यायाने सात्त्विक आणि नीतीमान प्रजेचे राष्ट्र असल्याने या समस्या तिथे अत्यल्प होतील अन् त्या झाल्या, तरी कर्तव्यदक्ष प्रशासनाकडून तत्परतेने दंड झाल्याने त्या नियंत्रित असतील. त्यासाठी राजा आणि प्रजा यांनी साधनारत असणे आवश्यक आहे. त्यातून निर्माण होणार्‍या संपूर्ण राष्ट्राच्या आतंरिक शक्तीची, ज्ञानाची, दैवी कृपेची, चैतन्याची उर्जितावस्था हाच राष्ट्राचा खरा विकास आणि समृद्धी आहे. हे साध्य होण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे. हे प्राचीनतम त्रिकालाबाधित सत्य असणारे तत्त्व ‘सनातन प्रभात’ आज समाजमनावर बिंबवत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे उच्च कोटीचे अवतारी संत ‘सनातन प्रभात’ला संस्थापक संपादक म्हणून लाभणे, धर्माच्या पुनरुत्थानाच्या कार्यासाठी ‘सनातन प्रभात’ कार्यरत रहाणे, म्हणजेच हिंदु राष्ट्रासाठी त्याने समाजमन घडवण्याचे कार्य करणे, ही प्रसिद्धी माध्यमांच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. ‘सनातन प्रभात’ हे कार्य राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजून करत आहे. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरही त्याच्या सफलतेसाठी ‘सनातन प्रभात’ला असेच संपूर्णतः समर्पित रहाता येऊदे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !