गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद सगळ्यांनीच ग्रहण केला. यानिमित्ताने वसंत ऋतूत कडू रस ग्रहण करण्याविषयीचे विश्लेषण येथे देत आहे.
कडुनिंबाची चटणी सिद्ध करून त्या निमित्ताने पोटात जाणारा कडू रस हा केवळ गुढीपाडव्यानिमित्तच मर्यादित नसून वसंत ऋतू संपेपर्यंत अधूनमधून खायचा आहे, तसेच वसंत ऋतूनुसार आहार विहार करावा. थंडीनंतर वाढलेल्या तापमानामुळे उन्हाळ्याचा भास जरी झाला, तरी अजून तीव्र असा थंड, पातळ, गोड, सरबते इत्यादी खाण्या-पिण्याचा उन्हाळा आलेला नाही.
जोपर्यंत ढग आणि ऊन असे आलटून पालटून आहे, बहावा अन् फुले फुलत आहेत, सकाळ-संध्याकाळ वारे आणि दुपारी कडक ऊन आहे, तोपर्यंत अन् त्या ठिकाणी उन्हाळ्याचे खाणे-पिणे टाळावे. आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे वर्षभर आहार सहाही चवींनी (गोड, आंबट, खारट, तिखट, कडवट आणि तुरट) युक्त असावा. या दृष्टीने आपण जेव्हा भारतीय स्वयंपाकाचा विचार करतो, तेव्हा कडू रसाचे मेथी दाणे आणि हळद यांच्या फोडणीमधील वापराची उपयुक्तताही लक्षात येते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (९.४.२०२४)
(साभार : फेसबुक)