Hindus Converting To Buddhism : हिंदूंनी धर्मांतरासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून संमती घेणे अनिवार्य ! – गुजरात

गुजरातमधील भाजप सरकारचे परिपत्रक

कर्णावती (गुजरात) – गुजरातमध्ये दसर्‍याच्या दिवशी आणि इतर महत्त्वाच्या सणांच्या दिवशी दलित हिंदु बौद्ध धर्म स्वीकारतात. त्या अनुषंगाने गुजरातमधील भाजप सरकारने परिपत्रक काढले आहे. यात म्हटले आहे, ‘हिंदु धर्मातून बौद्ध, जैन, शीख किंवा अन्य कुठल्याही धर्मात धर्मांतर करायचे असेल, तर जिल्हाधिकार्‍यांची तशी संमती घेणे आवश्यक आहे. ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा २००३’च्या तरतुदी प्रमाणे ते सक्तीचे आहे’, असे यात म्हटले आहे. बौद्ध धर्म स्वीकारणार्‍या अर्जांवर नियमाप्रमाणे कार्यवाही होत नाही, असे लक्षात आल्यानंतर गुजरात सरकारने ८ एप्रिल या दिवशी हे परिपत्रक काढले. बौद्ध धर्म हा स्वतंत्र धर्म असून धर्मांतरासाठी आधी जिल्हाधिकार्‍यांची संमती आवश्यक असल्याचे सूत्र यात नमूद करण्यात आले आहे.

या परिपत्रकात म्हटले आहे की,

१. जिल्हाधिकारी कार्यालये ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्या’चा अर्थ त्यांना हवा तसा घेत आहेत. हिंदु धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची संमती मागणार्‍या अर्जांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची घटना निदर्शनास आली आहे. तसेच काही वेळा असेही निदर्शनास आले आहे की, अर्जदार स्वायत्त संस्थांकडून असे निवेदन आणतात की, हिंदु धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्यासाठी पूर्व संमती आवश्यक नाही. मात्र ही गोष्ट तशी नाही. बौद्ध हा वेगळा धर्म आहे. या धर्मात परिवर्तन करायचे असेल, तर संमती घेणे अनिवार्य आहे.

२. गुजरातमध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारला जातो. ‘गुजरात बुद्धिस्ट अकादमी’ या संस्थेतर्फे धर्मांतराचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याच अकादमीचे सचिव रमेश बनकर यांनी या परिपत्रकाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, कायद्याचा चुकीचा अर्थ आतापर्यंत लावला जात होता. आता सरकारच्या परिपत्रकामुळे हे स्पष्ट झाले आहे की, बौद्ध हा वेगळा धर्म आहे आणि त्याचा हिंदु धर्माशी संबंध नाही. प्रशासनातल्या काही जणांनी संभ्रमाचे वातावरण निर्माण केले होते. ते या पत्रकामुळे दूर झाले आहे.