संपादकीय : भारतावर खोटे आरोप !

ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने एका लेखाद्वारे पाक आणि भारतीय गुप्तचर यांचा तथाकथित संदर्भ देत ‘भारत सरकारने परदेशी भूमीवर रहाणार्‍या आतंकवाद्यांना नष्ट करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमधील अनेक लोकांची हत्या केली’, असा आरोप केला. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी हा दावा फेटाळून लावत ‘हे भारताच्या परराष्ट्र धोरणात बसत नाही’, असे सांगितले. पाकमध्ये दर काही दिवसांनी भारताला हव्या असलेल्या आणि भारताकडून कुख्यात आतंकवादी म्हणून प्रसिद्ध केलेल्या सूचीतील आतंकवादी अन् आतंकवाद्यांचे पाठीराखे अशांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या सर्वांचा ‘मारेकरी कुणी तरी अज्ञात आहे’, असेच बातम्यांमध्ये येत आहे. सामाजिक माध्यमांमध्ये राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या दृष्टीने ‘पाकमध्ये आतंकवाद्यांच्या संदर्भात जे होत आहे, ते चांगले होत आहे. भारत सरकारच्या थेट सहभागाने नसले, तरी भारताच्या कूटनीतीचा हा भाग आहे, भारताने हे हस्ते-परहस्ते चालूच ठेवावे’, असे मतप्रवाह आहेत. एकूणच पाकमधील आतंकवाद्यांना त्यांच्या देशातच घुसून ठार मारण्याच्या कृतीचे भारतीय कौतुकच करत आहेत आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सामरिक यश मानले जात आहे. भारताने पाकमध्ये घुसून केलेल्या कारवाईचे भारतीय स्वागतच करतील.

पाकिस्तानच कारवाई करण्याची शक्यता

‘द गार्डियन’ने केलेल्या दाव्यानुसार भारतीय गुप्तचर त्यांना माहिती देण्याची शक्यता नाही; मात्र पाकचे गुप्तचर काहीही, म्हणजे खोटी माहिती देऊ शकतात, हे मात्र सत्य आहे. पाकमध्ये तसे पाहिले गेल्यास अराजकसदृश्य परिस्थिती आहे. पाक आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेला; मात्र वरकरणी तसे दाखवू न देणारा देश आहे आणि तो तर आतंकवादी बनवणारा आंतरराष्ट्रीय कारखाना आहे. पाकमध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे बलुची बंडखोर पाकची संसद, महत्त्वाची शहरे, सैन्याचे तळ यांवर आक्रमणे करून तेथील व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानातील आतंकवादी गट ज्यामध्ये प्रामुख्याने तालिबानचे आतंकवादीही घातपात करत आहेत. पाकचे पोलीस आणि सैन्यही जेथे या आतंकवादी आक्रमणांपासून सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसामान्य नागरिकांची काय कथा ? पाकला कर्ज देतांना अथवा साहाय्य करण्यास आंतरराष्ट्रीय संघटनाच नव्हे, तर अरब देशही हात आखडता घेत आहेत किंवा साहाय्य करणेही नाकारत आहेत. अशा पाकला आतंकवादाचे जे बीज त्याने पेरले, तेच त्रासदायक होत आहे. त्यामुळे स्वत: निर्माण केलेला आतंकवादाचा भस्मासुर पाकलाच गिळून टाकेल, या भीतीपोटीही पाकचे सैन्य अथवा पोलीस यांच्याकडूनच या आतंकवाद्यांच्या हत्या केल्या जाऊ शकतात. पाकच अशी पावले उचलून भारतावर आरोप करण्यासाठी त्याचा अपवापर करू शकतो. काही आतंकवाद्यांचे तर अपहरण करून त्यांना ठार करण्यात आले आहे. काही आतंकवादी पाकच्या पुष्कळ गुप्त ठिकाणांमध्ये वास्तव्याला असतांना त्यांची हत्या करण्यात आली आहे. पाकची ही गुप्त ठिकाणे पाकचे सैन्य आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाला माहिती असण्याचीही तेवढी शक्यता नाही. त्यामुळे पाककडूनच गुप्तपणे आतंकवादाची डोकेदुखी दूर करण्यासाठी पावले उचलली जाऊ शकण्याची शक्यता आहे. पाकमध्ये चीनचे अनेक विकास प्रकल्प चालू आहेत. या विकास प्रकल्पांवर काही वेळा आतंकवादी, तर काही वेळा बलुची बंडखोर आक्रमणे करत आहेत. या सर्वांचा विचार करता आणि अत्यंत अचूक कारवाईची स्थिती लक्षात घेता आतंकवाद्यांच्या हत्यांवर पाकचे मौन पहाता तोच या कारवाया करत आहे, हे सिद्ध होऊ शकते.

जशास तसे उत्तर !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘द गार्डियन’मधील लेखावरून ‘आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून मारू’, असे विधान केले आहे. त्यांची ही चेतावणी किंवा केलेल्या कृतीची अप्रत्यक्ष दिलेली स्वीकृती असू शकते. काही झाले, तरी भारत आता सूड उगवणार, हे मात्र खरे आहे. भारताच्या पालटत्या परराष्ट्र धोरणाची अथवा संरक्षण भूमिकेचे निर्देशक म्हणण्यास हरकत नाही. पूर्वी भारतात आतंकवादी आक्रमण झाले की, त्याविषयी चौकशी करणे, गुन्हे नोंदवणे, कुणीतरी पकडले जाणे, उर्वरित पसार होणे किंवा देशाबाहेर पळून जाणे, न्यायालयात त्याविषयीचे खटले वर्षानुवर्षे चालणे, तोपर्यंत पुन्हा एखादे आक्रमण होणे अशी दीर्घकालीन आणि आतंकवाद्यांना कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन मिळणारी स्थिती होती. आता थोडे चांगले दिवस आले आहेत, असे म्हणू शकतो.

पाकमधील आतंकवादी यमसदनी जाऊ लागल्यामुळे कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांच्या संदर्भातही भारत असेच काही करील, याची भीती कॅनडाला जाणवत आहे. त्यामुळे तोही खलिस्तानींच्या हत्येसाठी भारताला कारणीभूत ठरवत आहे. त्याही पुढे जात आता कॅनडा म्हणत आहे, ‘कॅनडाच्या निवडणुकांमध्येही भारताने हस्तक्षेप केला.’ याविषयी कॅनडाच्या गुप्तचर विभागाकडून प्रकाशित केलेल्या एका अहवालातच अशी माहिती देण्यात आली आहे. हे कॅनडाचे अतीच झाले, असे म्हणावे लागेल. आधीच ‘आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची भारताने हत्या केली’, या विधानाविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ना भारताला ना जगाला कोणताही पुरावा सादर करू शकले. तरी त्यांचे आरोप करणे चालूच आहे आणि कॅनडाच्या गुप्तचर विभागाने वरील आणखी एक खोटा आरोप केला आहे. यामागे खलिस्तान्यांचे डोके असू शकते; कारण ते त्यांच्याच इशार्‍यावर चालत आहेत, असे त्यांचे एकूण वर्तन आहे. ‘आतंकवादी गुरुपतवंतसिंह पन्नू याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला’ असा आरोप अमेरिकेची गुप्तचर संस्था करत आहे. याविषयी अमेरिकाही पुरावे सादर करू शकली नाही. भारताने पन्नू याला मारायचे ठरवले असते, तर भारत तसे कधीच करू शकला असता. ‘पन्नू हा अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’चा दलाल आहे’, असे त्याविषयी भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे भारत त्याच्यावर काही कारवाई करत नाही, असा सर्वसाधारण सूर आहे. असे असेल, तर ‘भारताने पन्नू याला मारण्याचा कट केला’, असे अमेरिकेने म्हणणे, हे भारताची अपकीर्ती करण्यासारखे आहे. सद्दाम हुसेन, कासीम सुलेमानी यांच्यावर आतंकवाद पसरवण्याचा दावा करत त्यांना ठार करणारी अमेरिका भारतावर मात्र खलिस्तानी आतंकवाद्यांना मारण्याचा कट रचल्याविषयी आकांडतांडव करते. अशी दुटप्पी अमेरिका अन् धूर्त कॅनडा यांना भारताचा जागतिक स्तरावर वाढता दबदबा सहन होत नाही. एक विकसनशील देश असूनही भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारी पत विकसित देशांसाठी आव्हान ठरत आहे. ‘भारतातील निवडणुकांवर टीका केल्यास जोरदार प्रत्युत्तर मिळेल’, असे देशाचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी अन्य देशांना ठणकावले आहे. त्यामुळे भारताने आता इस्रायलप्रमाणे आक्रमक परराष्ट्रनीती अवलंबणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतविरोधी पाश्चात्त्य, इस्लामी आणि ख्रिस्ती देशांनी केलेल्या टीकेला भारताने ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !