दुष्प्रवृत्तींचे निर्दालन अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा !

९ एप्रिल २०२४ या दिवशी गुढीपाडवा आहे. त्या निमित्ताने…

हिंदु धर्म आणि संस्कृती उत्सवप्रिय आहे. गुढीपाडव्यापासून होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरामध्ये  अनेक वेगवेगळे सण-उत्सव मोठ्या आनंदाने हिंदु संस्कृतीनुसार साजरे केले जातात.

श्री. अनिल दत्तात्रेय साखरे

महाकवी कालिदासांनी तर ‘उत्सवप्रिय खलू मनुष्य’ असे यथोचित वर्णन केले आहे. उत्सव आपल्याला आवडतात; कारण प्रतिदिनच्या जीवन व्यवहारांमध्ये दबलेला माणूस उत्सवाच्या दिवशी स्वतःची खिन्नता दूर करून नातेवाईक, मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांच्यासोबत आनंद प्राप्त करतो. त्यासाठीच प्रत्येक उत्सव हा भावपूर्ण अंतःकरणाने साजरा केला पाहिजे.

हिंदु सण-उत्सव आपल्याला वेगवेगळे संदेश देतात. गोकुळाष्टमी, रामनवमी, महाशिवरात्र हे आपल्याला त्यांच्याशी एकरूप होण्यासाठी दैवी जीवनाची ओढ लावतात. संक्रांतीचा उत्सव खरी संघनिष्ठेची प्रेरणा देतो. होळी आपल्याला राग, द्वेष, खोटे तर्क-कुतर्क, तसेच उच्च-नीच भेद जाळून टाकण्याचा संदेश देतो, तर दिवाळी आपल्याला दीक्षा घेऊन जीवन उन्नत बनण्याचा संदेश देते. खरे तर भारताचा सांस्कृतिक इतिहास पुस्तकांच्या पानात नाही, तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिलेला आहे. या संस्कृती उत्सवांच्या मागे असलेला आमच्या ऋषिमुनींचा महान दृष्टीकोन समजला, तर त्यांच्यासमोर मानव कृतज्ञता बुद्धीने नतमस्तक होईल.

१. शालिवाहन शकची पार्श्वभूमी

चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये ‘गुढीपाडवा’ म्हणतात. वृक्ष, वनस्पती यांची पानगळ करणारा शिशिर ऋतू संपून ऋतुराज वसंताचे आगमन झालेले असते आणि ही संपूर्ण चराचरसृष्टी नव्या चैत्र पालवीने नव्या नवलाईने रंगायला लागलेली असते. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मोठा मुहूर्त आहे आणि शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवसापासून होते. पैठणच्या शालिवाहन किंवा सातवाहन राजांनी अतुलनीय पराक्रम गाजवून परकीय आक्रमक शक राज्यकर्त्यांवर मिळवलेल्या दैदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ त्या राजांनी त्यांच्या नावाने कालगणना चालू ठेवली. तिलाच ‘शालिवाहन शक’, असे म्हटले जाते. शालिवाहन शक हे इसवी सन ७८ ला चालू झाले, म्हणजे इंग्रजी वर्ष २०२४ मधून ७८ वजा केले की, आपल्याला शालिवाहन शक १९४६ मिळेल. या वर्षीच्या शकाचे नाव ‘क्रोधीनाम संवत्सर’ असे आहे.

२. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचे पूजन

गुढीपाडव्याच्या दिवशी घराला आंब्यांच्या पानांचे तोरण लावले जाते. पवित्र दंडाला उदकाने स्वच्छ करून त्यावर चंदनाचे गंध, हळद आणि कुंकू लावून सुशोभित करतात. मग भरजरी वस्त्र, पुष्पहार, साखरेची माळ बांधली जाते. त्यावर मांगल्याचे प्रतीक असलेला तांब्याचा कलश ठेवला जातो. त्यानंतर गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत करतात. प्रसाद म्हणून कडुलिंबाची पाने आणि साखर वाटली जाते. यामध्येही आयुर्वेदाने मनुष्याचा विचार केलेला दिसतो की, पुढच्या काळात उष्णता वाढत जाऊन उष्णतेचे विकार संभवतात. कडुनिंब हे उष्णतेवरील गुणकारी औषध आहे; म्हणूनच पाडव्याच्या दिवशी प्रसाद म्हणून कडुनिंबाची पाने आणि साखरेचे भक्षण केले जाते.

३. गुढीपाडव्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व

हिंदुस्थानासाठी गुढीपाडव्याचे दुसरे महत्त्व, म्हणजे लंकेच्या रावणाचा वध करून विजयी प्रभु श्रीरामचंद्र सीतेसह अयोध्यानगरीमध्ये परतले ते गुढीपाडव्याच्या दिवशी ! त्यामुळे सगळ्या अयोध्यावासियांनी संपूर्ण नगरामध्ये रस्त्यारस्त्यावर रांगोळ्या काढून, घराघरांमध्ये गुढ्या उभारण्यासह दीप प्रज्वलित केले. संपूर्ण नगरामध्ये पताका, धर्मध्वज उभारून, मंगलवाद्यांच्या निनादात प्रभु श्रीरामचंद्रांचे सपत्नीक अयोध्यानगरीत स्वागत केले.  त्यामुळे गुढीपाडव्याचा हा दिवस विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवसाला नैसर्गिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्व मिळाले आहे.

४. प्रभु श्रीराम श्रीराममंदिरात ५०० वर्षांनंतर विराजमान

आता पुन्हा एकदा प्रभु श्रीरामांच्या श्रीराममंदिराचा ५०० वर्षांचा वनवास संपला आहे. परकीय आक्रमक धर्मांधांनी उद्ध्वस्त केलेल्या अयोध्येत (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिराची पुनर्उभारणी चालू आहे. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये बांधकाम केलेल्या भव्य दिव्य श्रीराममंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ या दिवशीच्या शुभमुहूर्तावर प्रभु श्रीरामचंद्र  विराजमान झालेले आहेत. जगातील सर्व हिंदु धर्मियांसाठी हा आनंदाचा विजयाचा मांगल्याचा क्षण होता. प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांनी जसे असुरांच्या निर्दालनाचे कार्य केले, त्याचप्रमाणे आताही उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्या प्रदेशातील अनेक गुंडांचे निर्दालन करत आहेत.

५. सण-उत्सवांमुळे बाजारात तेजीचे वातावरण

सण-उत्सवांच्या मुहूर्तावर मोठमोठ्या वस्तू, वाहने आदी विविधांगी खरेदी करण्याची मानसिकता भारतवासियांची आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा हा सण या दृष्टीनेही मोठा ठरतो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवनवीन वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जाते. नवीन भूमी, सदनिका, सोने-चांदी, वाहन यांची खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तर कुठे नव्या उद्योग व्यवसायाचा प्रारंभ केला जातो. बाजारातील मोठमोठी आणि ‘ऑनलाईन’ विक्री करणारी आस्थापने गुढीपाडव्याच्या निमित्ताने आठवडाभर आधीपासूनच ‘विशेष सवलतींच्या योजना’ घोषित करत असतात. यामध्ये सहस्रो कोटी रुपयांची उलाढाल होत असते.

असा हा आनंद घेऊन येणारा आणि दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी सिद्ध होण्याची अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा, तसेच पराक्रमाची साक्ष देणारा गुढीपाडवा उत्साहाने साजरा करूया !

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व). (४.४.२०२४)