परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य आरंभ केले. त्या उद्देशपूर्तीसाठी त्यांनी आनंदप्राप्तीसाठी साधनेसंबंधी अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक लहान-मोठी प्रवचने घेणे, असे विविध मार्ग अवलंबले. आता देश-विदेशांतील सहस्रो साधक त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेनेच वर्ष २००२ मध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. समितीचे ध्येय – हिंदु राष्ट्राची स्थापना !

हिंदु जनजागृती समितीचा मूळ उद्देश हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्यावर दाटून आलेल्या संकटांचे ढग यांविषयी जागृत करणे आणि हिंदूंचे संघटन करणे हा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले जाते.

या अधिवेशन काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले होते. त्यातील काही अंश पुढे दिले आहेत.

१ अ. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने साधना समजून घ्या !

१ अ १. साधना करणारा मनुष्यच वास्तविक खर्‍या अर्थाने ‘मनुष्य’ असतो ! : साधना केली नाही, तर मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये काय भेद राहील ? संस्कृतमध्येे एक सुभाषित आहे.

आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥

– हितोपदेश, कथामुख, श्‍लोक २५

अर्थ : आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी पशू अन् मानव यांच्यात समान आहेत. धर्माचरण ही मानवाकडील अधिकची विशेष गोष्ट आहे. धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.

जोे साधना करतो, तोच खर्‍या अर्थाने ‘मनुष्य’. बाकी सर्व, म्हणजे साधना न करणारे ‘मनुष्य देहधारी प्राणी आहेत !’