Externment Notice To Bajrang Dal : बजरंग दलाच्या दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्हा संचालकाला हद्दपारीची नोटीस !

बजरंग दल आणि विहिंप यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त !

पुत्तूरू (कर्नाटक) : काँग्रेस सरकारने बजरंग दलाचे दक्षिण कन्नड जिल्हा संचालक भरतकुमार कुम्डेल यांना बिदर जिल्ह्यातून हद्दपार करत असल्याची नोटीस देण्यात आल्याने विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

जनताच काँग्रेसला तिची जागा दाखवेल !

या वेळी विहिंपचे दक्षिण कन्नड जिल्हाध्यक्ष डॉ. कृष्ण प्रसन्न म्हणाले की, बाँबस्फोट करणार्‍या आतंकवाद्यांना ‘ब्रदर्स’ (भाऊ) असे संबोधण्याची परंपरा असलेले काँग्रेसचे नेते देशभक्त हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना हद्दपार करतात. ही काँग्रेसची हीन मानसिकता आहे. काँग्रेस सरकारच्या अशा हिंदुविरोधी कृत्याचा विहिंप आणि बजरंग दल तीव्र निषेध करत आहे. आता जनताच काँग्रेसला तिची जागा दाखवेल. हिंदूंना लक्ष्य करून हद्दपार करण्याची सरकारची हीन मानसिकता निषेधार्ह आहे.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु संघटनांवर दबाव आणण्याचा प्रयत्न !

विहिंपचे प्रांत गोरक्षा प्रमुख मुरलीकृष्ण हसंतड्क या संदर्भात म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीचे कारण सांगून काँग्रेस सरकार हिंदु संघटनांवर दबाव आणत आहे.  या संदर्भात राज्यातील जनताच आता योग्य तो निर्णय घेईल.

संपादकीय भूमिका

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात केवळ बजरंग दल आणि विहिंप यांनीच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध केला पाहिजे. हिंदूसंघटन झाल्यासच हिंदूंवरील असे अन्याय थांबू शकतात, हे हिंदूंनी जाणावे !