भारतीय अर्थव्यवस्था वाटचाल जोमाने : विरोधकांकडून भारताची विनाकारण अपकीर्ती

भारतातील उत्पादन क्षेत्राचा १६ वर्षांचा उच्चांक बघतांना विविध आस्थापनांकडे सातत्याने नवीन वस्तूंची मागणी वाढत आहे. त्यामुळे उत्पादनांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. उत्पादनात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकर भरती, बँकेकडून कर्ज घेणे, त्यासह सुटे भाग, वाहतूक व्यवसाय, साठवणूक, तसेच कच्चा माल यांच्या मागणीमध्ये  मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. निर्मिती क्षेत्राचा वाढ दर्शवणारा ‘पी.एम्.आय.’ (पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स – क्रय (खरेदी) व्यवस्थापन निर्देशांक) निर्देशांकाने सातत्याने मागील ३३ मासांमध्ये कार्यात्मक आणि गुणात्मक परिस्थितीमध्ये सुधारणा दर्शवली आहे. हा निर्देशांक ५९.१ गुणांकावर, म्हणजेच सर्वोत्तम अशा पातळीवर गेला आहे. त्यासह पालटलेल्या जागतिक भूराजकीय समीकरणामुळे परदेशांमधूनही मोठ्या प्रमाणावर भारतीय कंपन्यांकडे नवीन मागण्या वाढत आहेत, तसेच निर्यातीमध्येही सातत्याने बर्‍यापैकी वाढ होऊन चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणात न्यून होत आहे. त्यामुळे परकीय चलन बाजारात रुपयाची घसरण थांबली असून मागील काही मासांपासून रुपया अगदी भक्कमपणे उभा राहिला आहे, तसेच केंद्र सरकारकडूनही मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांवर व्यय केला जात असल्यामुळे हा व्यय निर्मिती क्षेत्रासाठी सकारात्मकच राहिला आहे. यामुळे आस्थापनांच्या उत्पादित वस्तूंची विक्री सुधारण्यास साहाय्य झाले. याखेरीज रोजगारामध्येही बर्‍यापैकी सुधारणा झाली.

१. अर्थव्यवस्थेच्या दमदार वाटचालीविषयीची काही लक्षणे

‘भारतीय अर्थव्यवस्थेच्या दमदार वाटचालीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे ओढा आणि विश्वास वाढत आहे. त्यामुळे सातत्याने परदेशी गुंतवणूक भारतीय बाजारपेठेमध्ये वाढत चाललेली आहे’, असे स्वतः ‘सेबी’च्या (भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या) अध्यक्षा माधुरी पुरी यांनी सूतोवाच केलेले आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी हे सकारात्मक आहे. काही दिवसांपूर्वी ‘म्युच्युअल फंडांची स्ट्रेस टेस्ट’ही घेतली गेली आहे. (म्युच्युअल फंडांची ताण चाचणी – फंडातून पैसे काढून घेण्यास घाई केली, तर फंड व्यवस्थापक खातेदारांचे पैसे किती लवकर परत देऊ शकतो, याची पडताळणी करणे, हा या ताण चाचणीचा उद्देश आहे.) या चाचणीमध्ये हे सर्व ‘म्युच्युअल फंड’ (सामायिक निधी) उत्तीर्ण झालेले आहेत. महिना गणिक सातत्याने वाढणारे वस्तू आणि सेवा कराचे (‘जी.एस्.टी’चे) संकलन, विविध आस्थापने अन् वैयक्तिक करदाते यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर झालेला आगाऊ कर भरणा, वीज अन् उर्जा यांचा सातत्याने वाढत असलेला वापर यावरून अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल लक्षात येते.

श्री. अनिल साखरे

२. आस्थापनांचे बाजार भांडवल ५ पटींनी वाढणे

सद्यःस्थितीला भारतीय बाजारातील सूचीबद्ध आस्थापनांचे बाजार भांडवल ३७८ लाख कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या दशकभरात त्यामध्ये ५ पटींनी वाढ झाली आहे आणि ते सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवर आले आहे. यापुढेही त्याला अधिक वाढीला वाव आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षामध्येही भांडवली बाजार किंवा मुंबईचा समभाग विक्रीचा ‘सेन्सेक्स’ १ लाखांच्या आकड्याकडे वाटचाल करील, अशी अपेक्षा आहे.

३. अमेरिका, चीन आणि युरोप यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली

केंद्र सरकारच्या कर महसूलाकडे बघितले, तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जवळपास ३४ ते ३७ लाख कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळवत आपले निर्धारित कर संकलनाचे लक्ष पूर्ण केलेले आहे. सातत्याने वाढणारे ‘जी.एस्.टी’ संकलन देशांतर्गत वस्तू आणि सेवांचा वाढता उपभोग, त्यांची मागणी, त्यासह मागील काही वर्षांपासून सरकारकडून वाढत असलेला भांडवली व्यय या सगळ्यामुळे देशाची अर्थव्यवस्थेला गती येण्यास मोठ्या प्रमाणात साहाय्य झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्था २ ते ३ टक्क्यांच्या वाढीने; तर अमेरिका, चीन आणि युरोप यांच्या अर्थव्यवस्था २ ते अडीच टक्क्यांच्या वाढीवर अडखळत असतांना भारतीय अर्थव्यवस्था मात्र ८.४ टक्के या गतीने चांगली वाटचाल करत आहे. हे देशासह जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्था आणि विकास यांसाठी आश्वासक असेच आहे.

४. काही व्यक्ती, संस्था अन् अर्थतज्ञ यांच्याकडून केंद्र सरकारला अपकीर्त करण्याचे कार्य जाणीवपूर्वकच !

‘केअर रेटिंग’ या आस्थापनाने दिलेल्या अहवालानुसार भारतीय बँकिंग व्यवस्थेतील बुडित कर्जाचे प्रमाण हे २.१ टक्क्यांच्या खाली रहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांचे एकंदरीत नफा तोटा पत्रक सुधारून लाभाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. परिणामी गुंतवणूकदारांनाही चांगला परतावा मिळेल, अशी अपेक्षा केली जाते. ‘केअर रेटिंग’चे हे वृत्त भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील सर्व सकारात्मक बातम्या वाचतांना वा बघतांना भारतीय रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकारने वेळोवेळी स्वीकारलेले लवचिक आर्थिक धोरण, त्यांनी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात घेतलेले योग्य ते निर्णय यांमुळे देशात मागील काही वर्षांपासून सकारात्मक परिणाम सातत्याने दिसत आहेत. असे असतांना अर्थतज्ञ रघुराम राजन आणि इतर अर्थतज्ञ यांची नकारात्मक मते पसरवून विनाकारण भारतीय अर्थव्यवस्थेला अन् पर्यायाने केंद्र सरकारला अपकीर्त करण्याचे कार्य काही व्यक्ती, संस्था आणि अर्थतज्ञ यांच्याकडून जाणीवपूर्वक चालू आहे, असे प्रकर्षाने जाणवते.

– श्री. अनिल साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व). (३.४.२०२४)