आत्महत्येचे कारण अद्याप अनुत्तरीत
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशांच्या समोरच ३ एप्रिल या दिवशी श्रीनिवास नावाच्या व्यक्तीने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. येथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांनी तात्काळ त्याला यापासून परावृत्त केले आणि जवळच्या रुग्णालयात नेले. ते त्याच्यावर उपचार चालू आहेत. या घटनेनंतर मुख्य न्यायाधिशांनी उच्च न्यायालयाच्या सुरक्षाव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. या घटनेनंतर उच्च न्यायालयाची सुरक्षा वाढवण्यात आली. श्रीनिवास याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. डॉक्टरांच्या अनुमतीनंतर पोलीस श्रीनिवास याची चौकशी करणार आहेत.
धारदार वस्तू न्यायालयात कशी आणण्यात आली ? – मुख्य न्यायाधिशांचा प्रश्न
मुख्य न्यायाधीश अंजारिया यांनी उच्च न्यायालयाच्या आवारातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आणि ‘ती व्यक्ती न्यायालयात धारदार वस्तू आणण्यात कशी यशस्वी झाली ?’, अशी विचारणा केली. त्यांनी पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करण्याचा आदेश दिला.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! उच्च न्यायालयात थेट मुख्य न्यायाधिशांसमोर शस्त्र घेऊन तरुण येतो, यातून तेथील सुरक्षेचे धिंडवडेच निघाले आहेत. याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे ! |