राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे नाव न घेता केले आवाहन
अस्ताना (कझागिस्तान) – आतंकवादाचे समर्थन करणार्यांना धडा शिकवण्यात दिरंगाई होता कामा नये, अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानचे नाव न घेता आवाहन केले. येथे आयोजित शांघाई सहकार्य परिषदेत ते बोलत होते.
सौजन्य ANI News
१. अजित डोवाल पुढे म्हणाले की, भारत इतर देशांशी व्यापार आणि संपर्क वाढवण्यासाठी कटीबद्ध आहे. परिषदेचे सदस्य देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता लक्षात घेऊन असे उपक्रम घेतले जावेत. सीमेपलीकडील आतंकवादासह कुणीही, कुठेही, कोणत्याही हेतूने केलेले कोणतेही आतंकवादी कृत्य अजिबात समर्थनीय ठरू शकत नाही. सीमेपलीकडील आतंकवादात सहभागी असलेल्यांवर प्रभावीपणे आणि त्वरित कारवाई केली पाहिजे. आतंकवाद्यांसाठी केला जाणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी परिषदेच्या ‘फ्रेमवर्क टू काऊंटर टेररिझम’ अंतर्गत सहकार्यासाठी प्रभावी यंत्रणा सिद्ध करण्यास भारत समर्थन देतो आणि त्याला आणखी बळकट करण्यासाठी समर्थन देतो.
२. अफगाणिस्तानाविषयी डोवाल म्हणाले की, अफगाणिस्तानचा जवळचा शेजारी या नात्याने भारताचे अफगाणिस्तानमध्ये कायदेशीर सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध आहेत. अफगाणिस्तानातील मानवतावादी सहाय्य प्रदान करणे, सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक सरकारची निर्मिती सुनिश्चित करणे, आतंकवाद आणि अमली पदार्थांच्या तस्करीशी लढा देणे आणि महिला, मुले आणि अल्पसंख्यांक यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, हे भारताचे तात्काळ प्राधान्य आहे.
संपादकीय भूमिकाभारताने अन्य कुणाला असे आवाहन करण्याऐवजी स्वतःच आधी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच भारतीय जनतेला वाटते ! |