ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केली भीती !
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – देशात ७५ वर्षांपूर्वी ३० कोटी मानव आणि ७८ कोटी गायी होत्या. आता लोकसंख्या १४० कोटींवर पोचली आहे; पण केवळ १७ कोटी गायी शेष आहेत. ज्या पद्धतीने गोहत्या चालू आहे, ती थांबवली नाही, तर ५ वर्षांनंतर आपल्याला गायी चित्रात पहाव्या लागतील, अशी भीती ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे व्यक्त केली. ते येथील गीता प्रेसच्या चित्र मंदिरात ‘गोरक्षण आणि धर्म’ या विषयावर बोलत होते.
शंकराचार्यांनी सांगितले की, गोरखनाथ मंदिरात त्यांनी गायींच्या रक्षणासाठी बाबा गोरखनाथांना प्रार्थना केली. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गायी आणि निसर्ग यांचे रक्षण केले. आम्ही गोरक्षणासाठी मथुरा या भगवान श्रीकृष्णाच्या नगरीतून पायी प्रवास केला आणि देहलीमध्ये पोचल्यानंतर वर्ष १९६६ मध्ये गोरक्षण आंदोलनात गोळ्या झाडून प्राणांची आहुती देणार्या गोभक्तांना नमस्कार केला. गोरक्षणासाठी देवाला प्रार्थना केली आणि हिंदूंना त्यांच्या रक्षणासाठी कार्य करावे, यासाठी आवाहन केले.
(सौजन्य : India Speaks Daily)
गोरक्षणासाठी कोणताही मोठा पक्ष पुढे आलेला नाही !
शंकराचार्य पुढे म्हणाले की, देशातील २ सहस्र ६१५ पक्षांना पत्र लिहून गोरक्षणासाठी प्रतिज्ञापत्र देण्याची विनंती केली होती; परंतु कोणताही मोठा पक्ष पुढे आला नाही. आतापर्यंत ६१ छोट्या पक्षांनी माझ्याशी संपर्क साधून गोरक्षणाला पाठिंबा दिला आहे. गोरक्षणासाठी हिंदूंनी जागे होण्याची आवश्यकता आहे.
गोरक्षणासाठी झटणाऱ्या पक्षांना मतदान करा !
धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.
..तर गोरखपूरचे नामांतर करावे लागेल !
गोरखपूरच्या नावातच गायीचा समावेश आहे. येथून जर गोरक्षणाचे काम होत नसेल, तर गोरखपूरचे नाव पालटायला हवे; कारण जी नावे उपयोगी नाहीत, तीही पालटली जात आहेत, अशी मागणीही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या वेळी केले.