उद्योगपती मुकेश अंबानींनी मुंबई येथील कार्यक्रमात पायातील बूट काढून दीपप्रज्वलन केले !

रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी

मुंबई – राज्यपाल बैस यांच्या हस्ते, तसेच रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० मार्च या दिवशी ‘भारत रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदे’च्या वतीने देण्यात येणारे ५० वे रत्न आणि आभूषण निर्यात पुरस्कार हॉटेल ट्रायडेंट येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला ‘भारत रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदे’चे अध्यक्ष विपुल शहा, उपाध्यक्ष किरीट भंसाळी, पुरस्कार समितीचे निमंत्रक मिलन चोकसी, ‘भारत डायमंड बोर्स’चे अध्यक्ष अनुप मेहता प्रामुख्याने उपस्थित होते. त्या वेळी कार्यक्रमाच्या आरंभी दीपप्रज्वलन करण्यापूर्वी अंबानी यांनी नम्रपणे पायातील बूट काढले. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष आणि भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या या कृतीने उपस्थितांचे मन जिंकले. या कृतीचा व्हिडिओ सामजिक माध्यमांवर लोकप्रिय झाला, लोकांनी अंबानी यांची नम्रता आणि संस्कृतीप्रिय वर्तन यांचे कौतुक केले.

दीपप्रज्वलन करणे म्हणजे एकप्रकारे व्यासपिठावर कार्यरत होणार्‍या ज्ञानलहरींना आवाहन करणे आणि व्यासपिठावर निर्माण होणार्‍या ज्ञानमयी वायूमंडलातील ज्ञानलहरींना दीपज्योतीच्या माध्यमातून अखंड कार्यरत ठेवणे होय. त्यामुळेच दीपप्रज्वलन करतांना कधीही पायात चप्पल, बूट घालून करू नये, हे त्यामागील शास्त्र आहे. हे शास्त्र पाळत भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सगळ्यांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.