उत्सवाचे यंदाचे १९० वे वर्ष
तासगाव (जिल्हा सांगली), २ एप्रिल (वार्ता.) – गुढीपाडवा म्हणजेच ९ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२४’ प्रारंभ होत असून २० एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष १८३५ मध्ये चालू झालेल्या उत्सवाचे यंदाचे १९० वे वर्ष आहे. या उत्सवात प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता प्रभातफेरी, सकाळी ७ वाजता महापूजा, दुपारी १२.१५ वाजता महानैवेद्य, रात्री ७.१५ वाजता श्रीरामाला फराळाचा नैवेद्य, तसेच रात्री ७.३० वाजता करुणाष्टके, सवाया, श्रीरामरक्षा असे नित्य कार्यक्रम होतील. हे सर्व कार्यक्रम सिद्धेश्वर रस्ता येथील श्रीराममंदिरात होणार असून ९ एप्रिलला सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत श्रीराम शोभायात्रा होईल.
९ ते १६ एप्रिल या कालावधीत प्रतिदिन रात्री ९.३० वाजता चिपळूण येथील ह.भ.प. महेशबुवा काणे यांचे कीर्तन होईल, तसेच दुपारी भजन, सायंकाळी ६ वाजता प्रवचन असे कार्यक्रम होणार आहेत. १७ एप्रिल म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी सकाळी १० वाजता जन्मकाळ कीर्तन होईल, तर दुपारी १२.३० वाजता ‘श्रीं’चा जन्मकाळ होईल. १८ एप्रिल या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत महाप्रसाद होणार आहे. १९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ७ वसंतपूजा आणि रात्री ९ वाजता भाव-भक्तीगीत कार्यक्रम, तर २० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता लळीत आणि गोपाळकाला कीर्तन होईल. तरी अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून अधिक काळ चालू असलेली प्रभातफेरी !
गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ उत्सवकाळात प्रभातफेरी काढण्यात येते. ही प्रभातफेरी प्रतिदिन सकाळी ६ ते ७ या वेळेत तासगाव शहरातील विविध भागांतून काढण्यात येते. यात सर्व प्रकारे धान्य अर्पण घेण्यात येते, जे प्रामुख्याने उत्सव समाप्तीच्या काळात जो महाप्रसाद होतो, त्यासाठी वापरण्यात येते.