मुंबईत वीजदरात वाढ !

मुंबई – दक्षिण मुंबईतील साडेदहा लाख ग्राहकांना वीज देणार्‍या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या वीजदरात १ एप्रिलपासून सरासरी २० टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईत सर्वाधिक ३० लाख ग्राहकांना वीज देणार्‍या ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड’ या आस्थापनाच्या दरांमध्ये अत्यंत माफक म्हणजे ५ ते ६ टक्के वाढ झाली आहे. टाटा आस्थापनाने सरासरी ५५ टक्के वीज दरवाढ याआधीच निश्चित केली होती. सर्व वीज वितरण आस्थापनांचे नवे दर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी लागू आहेत.

वीज वितरण आस्थापनांच्या वीजदरांची निश्चिती ५ वर्षांनी होते. ‘बेस्ट’ उपक्रमाची वाढ प्रामुख्याने ० ते १०० आणि १०१ ते ३०० युनिट वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांच्या दरात आहे. अधिक वीज वापर असणार्‍या घरगुती ग्राहकांच्या वीजदरातील वाढ नाममात्र असून मासिक ५०१ युनिटहून अधिक वीज वापरणार्‍या ग्राहकांच्या दरात ३३ पैशांची घट झाली आहे.