पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली आशा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतील, अशी आशा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली आहे. ख्वाजा आसिफ यांचे हे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या वक्तव्यानंतर आले आहे. ते सिंगापूरमध्ये म्हणाले होते, ‘आतंकवादाने पाकिस्तानमध्ये उद्योगाचे रूप धारण केले आहे आणि आता भारत आतंकवाद सहन करणार नाही.’
वर्ष २०१९ मध्ये जेव्हा भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पाकिस्तानने त्यावर आक्षेप घेत भारतातून राजदूतांना माघारी बोलावले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध सतत ताणले गेले आहेत. ‘भारताला आधी जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घ्यावा लागेल, तरच दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील’, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे; मात्र भारताने पाकिस्तानचा हा सल्ला पूर्णपणे फेटाळून लावला आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे भारताने म्हटले आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तानने असे दिवास्वप्न पहाण्यापेक्षा भारतात घडवून आणण्यात येत असलेल्या आतंकवादी कारवाया प्रथम थांबवाव्यात, आतंकवादी निर्मितीचे कारखाने बंद करावेत, पाकमधील हिंदूंवर होणार अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत द्यावे. असे केले, तरच पाकशी संबंध सुधारण्यावर भारत विचार करू शकतो, असेच भारताने पाकला सांगितले पाहिजे ! |