केरळमधील कासारगोड येथून एक तरुण कासारगोड-थिरूवनंतपुरम् या ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसमध्ये चढला होता. त्याच्याकडे तिकीट नसल्याने त्याने स्वत:ला गाडीच्या शौचालयामध्ये कोंडून घेतले होते. प्रवाशांनी अनेकदा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर रेल्वे सुरक्षा दलाला माहिती दिली. यानंतर पुढच्या स्थानकावर ट्रेन थांबवून शौचालयाचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. यात भारतीय रेल्वे ची तब्बल १ लाख रुपयांची हानी झाली आहे. मोठी चूक करून ती लपवण्यासाठी वरून सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या मनमानी वागण्यामुळे आपल्या देशाची किती हानी होत आहे ? याचे अशा व्यक्तींना यत्किंचिंतही भान नसते. ‘सार्वजनिक मालमत्ता ही देशाची असते’ आणि ‘आपण समाजाचा घटक आहोत’, ही जाणीव त्यांच्यात निर्माण केली जात नाही. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेची हानी करतांना समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना काहीच वाटत नाही. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण झाले.
अशाच पद्धतीने गड-दुर्ग येथे झाडे, भिंती यांवर दगडाने नावे कोरणे, रेल्वेरूळ उखडणे, दंगलींच्या वेळी पोलीस चौक्या जाळणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे, बसची तोडफोड करणे, बसगाड्या किंवा रेल्वेचे डबे यांना आग लावणे आदी गोष्टी समाजकंटक जाणीवपूर्वक करत असतात. समाजभान नसणार्यांमुळे भारताची प्रगती अनेक वर्षे रखडली आहे. समाजकंटकांमध्ये देशभक्ती, देशप्रेमाचा तीव्र अभाव तर असतोच; उलट अशा कृती करून ते ‘राष्ट्राचा द्वेषच करतात’, असे लक्षात येते. राष्ट्राची संपत्ती म्हणून त्यांना कुठलीही आपलेपणाची व्यापक जाणीव नसते; कारण त्याची हानी झाल्यावर त्यांना दंडही होत नाही. दंगलींमध्ये धर्मांध करत असलेल्या हानीची भरपाई कधी वसूल केली जात नाही. प्रकरण न्यायालयात गेले, तरीही जात नाही. याउलट पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. वर्ष १९४५ मधील अणूबाँबच्या आक्रमणात जपान पूर्ण उद्ध्वस्त झाला होता; पण काही वर्षांतच तो पुन्हा उभा राहिला, तो तेथील नागरिकांच्या राष्ट्रप्रेमामुळेच ! जपानमध्ये विद्यार्थी स्वत: त्यांच्या शाळा, वर्गखोल्या, तेथील शौचालय स्वच्छ करतात. त्यामुळे शालेय जीवनापासूनच त्यांना शिस्त, देशभक्ती आणि स्वच्छता यांचे धडे मिळतात. इस्रायल भारतानंतर १ वर्षाने निर्माण होऊनही त्याने केलेली प्रगती ही केवळ त्यांचे देशप्रेम आणि लढण्याची जिद्द यांमुळेच आहे. कोणत्याही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम तेथील नागरिकांनी कट्टर ‘देशभक्त’ असणे आवश्यक असते. राष्ट्रीय संपत्तीची हानी करणारे सुधारत नसतील, तर त्यांना दंडित करणे आणि असे न होण्यासाठी सामाजिक बांधिलकी अन् देशभक्ती यांचे धडे लहानपणापासून देणे आवश्यक आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे