Katchatheevu Island Issue : इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला ‘कच्चाथीवू’ हे भारतीय बेट भेटस्वरूप दिले !

  • पंतप्रधान मोदी यांचा गंभीर आरोप

  • तमिळनाडू आणि श्रीलंका यांच्यामध्ये आहे हे बेट !

पंतप्रधान मोदी व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी

नवी देहली – काँग्रेसने श्रीलंकेला कच्चाथीवू बेट दिल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ मार्च या दिवशी केला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या या कृत्याचा राग प्रत्येक भारतियाला आहे. काँग्रेसवर विश्‍वास ठेवता येणार नाही. अशा कृत्यांमुळेच गेल्या ७५ वर्षांत भारताची एकता आणि अखंडता कमकुवत झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७४ मध्ये हे बेट श्रीलंकेले दिले होते. पंतप्रधानांनी हा दावा कच्चाथीवूवरील माहिती अधिकाराच्या अहवालाचा हवाला देत केला आहे. तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी माहिती अधिकाराखाली हा अर्ज केला होता. याआधी १० ऑगस्ट २०२३ या दिवशीही पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात अविश्‍वास प्रस्तावावर कच्चाथीवूच्या संदर्भात विधान केले होते.

माहिती अधिकाराच्या अहवालातील माहिती !

या अहवालात सांगण्यात आले आहे की,

१. वर्ष १९७४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती श्रीमावो बंदरनायके यांच्यात एक करार झाला होता. या अंतर्गत कच्चाथीवू बेट औपचारिकपणे श्रीलंकेला सुपूर्द करण्यात आले. इंदिरा गांधी यांनी तमिळनाडूतील लोकसभा प्रचाराकडे पहाता हा करार केला होता.

२. वर्ष १९७४ मध्ये दोन्ही देशांमध्ये दोन बैठका झाल्या होत्या. पहिली बैठक २६ जून १९७४ या दिवशी कोलंबोमध्ये, तर दुसरी बैठक २८ जून या दिवशी देहलीत झाली. दोन्ही बैठकांत हे बेट श्रीलंकेला देण्यावर सहमती झाली.

३. करारात काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. त्यांतील एक अट अशी होती की, भारतीय मासेमार या बेटावर जाळे सुकवण्यासाठी जाऊ शकतील. यासह बेटावर बांधण्यात आलेल्या चर्चमध्ये भारतियांना व्हिसामुक्त प्रवेश असेल.

पंतप्रधानांचे निराधार वक्तव्य ! – काँग्रेस

या दाव्यावर काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित म्हणाले की, कोणत्याही आधाराविना विधाने करणे, ही पंतप्रधानांची मुख्य अडचण आहे. पंतप्रधान ९ वर्षे काय करत होते ? तमिळनाडूत निवडणुका असल्यामुळे आणि तेथे भाजपचा पूर्ण धुव्वा उडत असल्याचे सर्व सर्वेक्षणांतून दिसून येत असल्यामुळेच ते अशी वक्तव्ये करत आहेत.

काँग्रेसला कोणताही पश्‍चात्ताप नाही ! – केंद्रीय गृहमंत्री

यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने कच्चाथीवूचा त्याग केला आणि त्याबद्दल तिला कोणताही पश्‍चात्ताप नाही. कधी काँग्रेसचे खासदार देशाचे विभाजन करण्याविषयी बोलतात, तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना अपकीर्त करतात. यावरून ते भारताच्या एकता आणि अखंडता यांच्या विरोधात असल्याचे दिसून येते.

कुठे आहे कच्चाथीवू बेट ?

तमिळनाडूच्या रामेश्‍वरम्पासून १९ किमी अंतरावर २८५ एकरमध्ये कच्चाथीवू पसरले आहे. हे बेट बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांना जोडते. १४ व्या शतकात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हे बेट तयार झाले. ते रामेश्‍वरम्पासून अनुमाने १९ किलोमीटर आणि श्रीलंकेच्या जाफना जिल्ह्यापासून अनुमाने १६ किलोमीटर अंतरावर आहे.

असा आहे बेटाचा इतिहास !

२८५ एकरांवर पसरलेले हे बेट १७ व्या शतकात मदुराईचा राजा रामनाद यांच्या अधिकारक्षेत्रात होते. पुढे ब्रिटीश राजवटीत हे बेट ‘मद्रास प्रेसीडेंसी’च्या कह्यात गेले. वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सरकारी कागदपत्रांमध्ये भारताचा भाग म्हणून त्यास घोषित करण्यात आले; परंतु श्रीलंका नेहमीच त्यावर स्वत:चा दावा सांगत आली आहे.

संपादकीय भूमिका

  • सामरिकदृष्ट्या इतक्या महत्त्वपूर्ण बेटाला शेजारी राष्ट्राला भेट म्हणून देणारी देशविरोधी काँग्रेस ! केंद्रशासनाच्या चीनविषयी धोरणावर आक्षेप नोंदवणार्‍या राहुल गांधी यांना त्यांच्या आजीने केलेल्या या घोडचुकीवरून जाब विचारला पाहिजे !
  • चिनी ड्रॅगनकडून मालदीव गिळंकृत झाल्यातच जमा आहे. श्रीलंकेचे हंबनतोटा बंदर असो कि पाकिस्तानचे ग्वादर बंदर, चीनने सर्व बाजूंनी भारताला शह देण्यासाठी कुटील डाव आखला आहे. अशात भारताने मालदीवला कह्यात घेण्यासह कच्चाथीवू बेटाला पुन्हा हस्तगत करणे आवश्यक आहे !