समान नागरी कायदा लागू करणे हाच सर्व समस्यांवर उपाय !

‘भारतीय परंपरेनुसार मंदिर आणि विद्या यांच्या क्षेत्रांवर शासनाचे कुठल्याही प्रकारचे अधिपत्य असू नये. त्यांच्यावर शासनाचे अधिपत्य किंवा अंकुश राज्यघटनेनुसार कुणी मान्य केला असेल, तर तो सर्वांवर सारखा असायला हवा. त्यामुळे समान नागरी कायदा ही या देशाची सर्वांत प्रथम आवश्यकता आहे आणि तो सर्वांसाठी लागू झाला पाहिजे. संप्रदाय आणि उपासनापद्धत यांच्या आधारे कुणालाही कुठल्याही प्रकारचे विशेष अधिकार मिळू नये. ‘समान नागरी कायदा’ हा या सर्वांवरचा उपाय आहे. 

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

१. मंदिरांना पर्यटनस्थळ म्हणून बनवतांना सरकारने निर्बंध लावणे आवश्यक !

सरकारने अर्थसंकल्पामध्ये आध्यात्मिक पर्यटनाला भर दिला आहे. सरकारला पावित्र्याची चाड असली पाहिजे. आपण काय करत आहोत, याचे भान असले पाहिजे. कुठल्याही मंदिराला पर्यटन स्थळ बनवत असतांना त्या ठिकाणी निर्बंध असले पाहिजेत. तेथे काय चालेल ? आणि काय चालणार नाही ? याची ग्वाही दिली गेली पाहिजे. पर्यटनस्थळ झाल्यावर तेथे अनेक प्रकारच्या अनाचारांना उधाण येते. अशा प्रकारचा अनाचार तेथे होणार नाही आणि तेथे मद्यपान केले जाणार नाही, याची प्रथम ग्वाही सरकारने दिली पाहिजे.

२. मुलांना शाळांमध्ये अंडे वितरण केल्याने त्यांच्यावर लहानपणापासून मांसाहाराचे संस्कार होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील सरकार मला पुष्कळ आवडते; पण या चांगल्या सरकारने ‘शाळेत अंड्यांचा प्रारंभ का केला ?’, असा प्रश्न मला पडतो. या वेळी मला लोकमान्य टिळकांचा ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’, हा एक सुप्रसिद्ध अग्रलेख आठवतो. ज्या सवयी आपल्या पुढच्या पिढीला लागू नये, अशा कुठल्याही सवयींचे बिजारोपण सरकारकडून होता कामा नये. चांगल्या घरच्या मुलांनाही अशा प्रकारे मांसाहाराकडे प्रवृत्त करण्यासाठी या गोष्टींचा दुरुपयोग होईल. त्यामुळे सरकारने स्वतःवर अनेक प्रकारचे निर्बंध स्वत: घालून घेतले पाहिजेत. यात सौजन्य आहे.

३. हिंदु धर्म विश्वव्यापक होण्यासाठी अबूधाबी येथील नूतन मंदिर लाभदायक ! 

हिंदु संस्कृती ही अतिशय व्यापक आहे. आपण कधीही कुणाचा द्वेष केला नाही. काही लोकांना द्वेषच शिकवला गेला आणि ते त्याला फसले, याला आपल्याकडे उपाय नाही. अशा द्वेषाला सामर्थ्याने उत्तरही द्यावे लागते; पण आपण ‘सभी भूमी गोपाल की, इसमे अटक कहा, जिसके मन में खटक रही, वोही अटक रहा’ असे गुरु गोविंदसिंह यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे आम्हाला सर्व विश्वाला आध्यात्मिक चेतनेमुळे एकत्र आणणे आवश्यक आहे. या वैश्विक कुटुंबात ‘हे विश्वची माझे घरे, एैसी मती जयाची स्थिर’, असे जर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींनी म्हटले, तर आपल्या घराघरांमध्ये कुठे मतभेद असतील, तर ते शांततेने मिटवले पाहिजेत. त्यासाठी संघर्षाची आवश्यकता नाही. हिंदूंचा हा दृष्टीकोन सगळीकडे पसरावा आणि यादृष्टीने अबूधाबी येथील स्वामी नारायण मंदिराचा उपयोग होईल, असे मला वाटते. हिंदुत्व याचा अर्थ ‘हिंदुइझम्’ असा होत नाही. ‘हिंदुनेस’ असा होतो. त्यामुळे काही प्रकारच्या सद्गुणांचा विकास, म्हणजे हिंदुत्व. कुणालाही त्यांच्या त्यांच्या उपासना पद्धतींमध्ये राहूनही हिंदुत्वाचा आलंब करता येतो, हे लोकांना कळले पाहिजे, तसेच हे आपण लोकांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक सावध होऊन पाऊले उचलली पाहिजेत.’

– प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संकेतस्थळ)