रंगपंचमी साजरी करण्यामागील शास्त्र आणि उद्देश

आज रंगपंचमी आहे. त्या निमित्ताने…

‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते हे हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहेत. आज सणानिमित्त केवळ चांगले कपडे परिधान करणे, चांगले भोजन करणे एवढ्या दृष्टीने सण साजरा करण्याची पद्धत झाली आहे; परंतु हिंदु सण साजरे करण्यामागे विशेष नैसर्गिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारण आहे. आपल्या प्रत्येक सणामागे एक अलौकिक असे धर्मशास्त्र आहे, ज्याचे पालन केल्याने आम्हाला आध्यात्मिक लाभ होतो. त्यामुळे सण, धार्मिक उत्सव आणि व्रते साजरे करण्याचा शास्त्राधार समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंगांचा उत्सव, म्हणजे रंगपंचमी आहे. होलिका दहनानंतर रंगांचा हा उत्सव साजरा केला जातो. आजच्या लेखातून रंगपंचमीचे शास्त्र, त्याचे लाभ इत्यादी विषयांची माहिती येथे देत आहोत.

रंगपंचमी खेळतांना ( प्रतिकात्मक छायाचित्रं)

१. प्रश्न : रंगपंचमी साजरी करण्याचा उद्देश काय ?

उत्तर : फाल्गुन कृष्ण पंचमी या दिवशी खेळली जाणारी रंगपंचमी ही विजयोत्सवाचे प्रतीक आहे. होळीमध्ये प्रज्वलित केलेल्या अग्नीमुळे वातावरणातील अनिष्ट शक्ती नष्ट होतात. होळीच्या दिवशी आरंभ झालेल्या कार्याच्या समारोपाचे रंगपंचमी हे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी, म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी यज्ञाचे प्राथमिक रूप, म्हणजे होळी प्रज्वलित करून स्वतः भगवान विष्णु पृथ्वीवर प्रथम आले आणि तेव्हा अनिष्ट शक्तींचा विनाश झाला. दुसर्‍या दिवशी, म्हणजे धुलिवंदनला होळीची राख (एक प्रकारचे भस्म) शरिरावर लावून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि ५व्या दिवशी या कार्याच्या समारोपाच्या रूपात रंगपंचमी साजरी केली जाते.

अनिष्ट शक्तींचा नाश झाल्यानंतर रंगांशी संबंधित देवता तत्त्वांचा लाभ घेणे, हासुद्धा रंगपंचमीचा उद्देश आहे. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी, म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांच्या अंगावर कोरडे रंग टाकले जातात किंवा रंगीत पाणी उडवले जाते. मराठ्यांच्या सत्ताकाळात या दिवशी मोठा दरबार भरवण्याची प्रथा होती. या दरबारात सरदार, जहागीरदार इत्यादी एकमेकांवर गुलाल उडवत होते.

२. प्रश्न : ‘रंगचिकित्सा’ (कलर थेरपी), देवता आणि मनुष्य यांचा काही संबंध आहे का ? रंगपंचमीच्या दिवशी याचा लाभ कसा होतो ?

श्री. रमेश शिंदे

उत्तर : ब्रह्मांडात विद्यमान असलेल्या गणपति, श्रीराम, हनुमान, शिव, श्री दुर्गा, दत्त आणि भगवान श्रीकृष्ण या ७ उच्च देवता ७ रंगांशी संबंधित आहेत. त्याच प्रकारे मानवाच्या देहात विद्यमान असलेल्या कुंडलिनीची ७ चक्रे, ७ रंग आणि ७ देवतांशी संबंधित आहेत. रंगपंचमी साजरा करणे याचा अर्थ आहे, ‘रंगांद्वारे ७ देवतांच्या तत्त्व तरंगांना जागृत करून त्यांना आकृष्ट करणे आणि त्यांना ग्रहण करणे होय.’ रंगांद्वारे एक प्रकारे आपण त्या रंगांशी संबंधित देवतांच्या तत्त्वाचा लाभ घेत असतो. सर्व देवतांची तत्त्वे मानवाच्या देहात परिपूर्ण झाल्यावर आध्यात्मिक दृष्टीने त्याची साधना पूर्ण होते. तो आनंदात मग्न असतो. यावरून हे सुद्धा स्पष्ट होते की, या रंगांद्वारे देवतातत्त्वाच्या स्पर्शाची अनुभूती घेणे, हाच रंगपंचमीचा एकमात्र उद्देश आहे. या उद्देशाच्या पूर्तीसाठी रंगांचा उपयोग २ प्रकारे केला जातो. पहिला म्हणजे हवेत रंग उडवणे आणि दुसरे म्हणजे पाण्याच्या साहाय्याने एकमेकांवर रंग टाकणे.

३. प्रश्न : या दिवशी हवेत रंग उडवण्याच्या कृती मागे काही शास्त्र आहे का?

उत्तर : अ. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांच्या शरिराला स्पर्श करून रंग लावल्यामुळे नाही, तर वायुमंडलात रंगांना सहर्ष उडवून तो साजरा करायला पाहिजे. त्या वेळी ‘रंगांच्या माध्यमातून देवतेला ब्रह्मांडात कार्य करण्यासाठी बोलावले जाते. अवतरित होणार्‍या देवतेच्या चैतन्य स्रोताचे स्वागत करण्यासाठी रंगकणांचा गालीचा अंथरला जात आहे’, असा भाव ठेवून प्रार्थना करत रंग उडवले पाहिजेत. यामुळे रंग उडवणार्‍या व्यक्तीत देवतेप्रती भाव वाढण्यास साहाय्य लाभते. त्यासह देवतांच्या तत्त्वांचाही लाभ होतो. अशा प्रकारे देवतेच्या चरणी नतमस्तक झाल्यामुळे रंगपंचमी साजरा करण्याचा उद्देश यशस्वी होतो.

आ. रंगपंचमीच्या दिवशी वातावरणात होणारी प्रक्रियाही आपण समजून घेतली पाहिजे.  रंगपंचमीच्या दिवशी तेजतत्त्वामक शक्तीचे कण, ईश्वरीय चैतन्य आणि आनंद यांचा प्रवाह पृथ्वीकडे आकृष्ट होतो. त्यासह ब्रह्मांडातील निर्गुण तत्त्वही पृथ्वीकडे आकृष्ट होते. वातावरणात चैतन्याचे वलय कार्यरत होऊन आनंदाचे वलय निर्माण होते. हवेमध्ये उडवलेल्या रंगांच्या माध्यमातून आनंदाच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होते. त्याच प्रकारे तेजतत्त्वात्मक शक्तीचे कण वातावरणात कार्यरत अनिष्ट शक्तीला नष्ट करतात.

४. प्रश्न : सध्या रंग लावण्यासाठी रासायनिक रंगांचा उपयोग केला जातो. त्याविषयी आणि नैसर्गिक रंग यांविषयी माहिती देऊ शकता का ?

बाजारात मिळणारे रासायनिक रंग ( प्रतिकात्मक छायाचित्रं)

उत्तर : होळीचा सण मानवजातीसाठी ऋषिमुनींची अमूल्य भेट आहे. हा सण परस्पर प्रेमभाव वाढवून आणि सारे भेदभाव विसरून परमात्म्याच्या जवळ जाण्याची प्रेरणा देतो. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता वाढवणे यांसाठी आपल्या सर्वांना मिळालेली एक सुसंधी आहे. पूर्वी होळी नैसर्गिक रूपाने खेळली जात होती. त्यात उपयोगात आणले जाणारे रंग नैसर्गिक असायचे; परंतु आजकाल नैसर्गिक रंगांचे स्थान कृत्रिम रंगांनी घेतले आहे आणि यामुळे सामान्य व्यक्तीच्या स्वास्थ्याला गंभीर हानी पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वर्ष २००१ मध्ये देहलीच्या ‘टॉक्सिक लिंक’ आणि ‘वातावरण’ या संस्थांद्वारे केलेल्या संशोधनात असे आढळले की, आजकाल होळीचे रंग ‘पेस्ट’, भुकटी आणि द्रव या ३ प्रकारांत मिळतात. हे तिन्ही प्रकारचे रंग शरिरासाठी हानीकारक आहेत. पेस्टमध्ये जे विषारी रसायन असते, त्याचे संभावित दुष्परिणाम खालील सारणीत दिले आहेत.

भुकटीच्या रूपात मिळणार्‍या रंगांमध्ये त्वचेसाठी हानीकारक ‘ॲस्बेस्टस’ किंवा ‘सिलिका’ आढळतात. द्रव रंगांमध्ये ‘जेन्शियन व्हॉयलेट’ टाकले जाते, ज्यामुळे त्वचेचा रंग परिवर्तित होण्याची आणि ‘डर्मेटायटिस’ नावाचा त्वचारोग होण्याची शक्यता असते.

लक्ष्मणपुरीच्या (उत्तरप्रदेश) ‘इंडस्ट्रियल टॉक्सिकोलॉजी रिसर्च सेंटर’चे उपनिर्देशक डॉ. मुकुल दास यांच्या मतानुसार होळीच्या वेळी वापरण्यात येणारे रंग अधिकांशतः रासायनिक आणि अखाद्य पदार्थांपासून उदा. कपडे, कागद, चामडे इत्यादींपासून बनवले जातात.

कृत्रिम रंग बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या विविध रसायनांची सारणी येथे देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक रंग बनवण्यासाठी कोणते रसायन बनवले जाते ? हे सांगितले आहे.

या सर्व रसायनांचा आरोग्यावर अनिष्ट प्रभाव होतो. अनेक दुकानदार असे रंग विकतात ज्यावर स्पष्ट लिहिलेले असते, ‘केवळ औद्योगिक उपयोगासाठी’, तरीही लोक अशा रंगांनी होळी खेळतात. हे आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहेत. या रासायनिक रंगांच्या ठिकाणी आपण नैसर्गिक रंगांचा उपयोग केला पाहिजे.

अ. नैसर्गिक रंगांचे महत्त्व : होळीच्या वेळी ऋतु परिवर्तन होत असल्यामुळे वातावरणात हानीकारक असंतुलन होऊन विकृती उत्पन्न होत असते. नैसर्गिक रंग स्वत:तील विशिष्ट गुणांमुळे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने या विकृतींना नियंत्रित करण्यास सक्षम असतात. त्यामुळे  रासायनिक रंगांच्या हानीपासून स्वतःला वाचवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा.

पाळसाचे फूल

अ १. नैसर्गिक रंग कोणते ? :

अ. पळसाच्या फुलांपासून बनवलेला केशरी रंग

आ. हळदीच्या चूर्णापासून पिवळा रंग

इ. मेंदीच्या चूर्णापासून बनवलेला हिरवा रंग

ई. बीटापासून बनवलेला जांभळा रंग

उ. झेंडूच्या फुलांपासून चमकदार पिवळा रंग

५. प्रश्न : बाजारात नैसर्गिक रंग उपलब्ध होत नाहीत, तर ते सिद्ध कसे करावेत ?

उत्तर : आपण नैसर्गिक रंग घरात बनवू शकतो. नैसर्गिक रंग बनवण्याची कृती येथे देत आहे.

अ. पळसाच्या फुलांपासून बनवलेला केशरी रंग : पळसाची फुले एक दिवस आधी तोडून आणून रात्री त्यांना पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळपर्यंत फुलांचा रंग पाण्यात उतरलेला असेल. हे पाणी गाळून घ्यावे. या रंगात गुलाबपाणी किंवा केवड्याचे अत्तर मिसळू शकतो. रात्री भिजवलेली फुले सकाळी उकळून सिद्ध झालेल्या रंगाचाही उपयोग करू शकतो. त्यासाठी उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर ते गाळून घेतले पाहिजे.

अ १. लाभ : पळसाच्या फुलांपासून बनवलेला रंग नैसर्गिक रंगांमध्ये सर्वाधिक आरोग्यदायी आणि औषधी गुणयुक्त आहे. हा रंग शरिरातील अनावश्यक उष्णता बाहेर काढतो आणि त्वचेशी संबंधित रोगांपासून रक्षण करतो. हा रंग कफ, पित्त, कुष्ठरोग, जळजळ, थांबून थांबून मूत्र होणे, वात आणि रक्तदोष दूर करण्यात साहाय्यक होतो. हा रंग रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्यात आणि मांसपेशींना निरोगी ठेवण्यात साहाय्यक असतो. हा रंग मानसिक आणि संकल्प शक्ती यांचाही विकास करतो.

आ. कोरडा हिरवा रंग : केवळ मेंदीच्या चूर्णात समभाग पीठ किंवा मैदा मिसळून बनवलेले मिश्रण कोरड्या हिरव्या रंगाच्या रूपात वापरू शकतो. १ लिटर पाण्यात २ चमचे मेंदीचे चूर्ण मिसळल्यावर द्रवरूपातील हिरवा रंग बनतो.

इ. पिवळा रंग : ४ चमचे डाळीच्या पिठात २ चमचे हळदीचे चूर्ण मिसळल्यावर कोरडा पिवळा रंग बनतो. हळदीच्या ऐवजी सुगंधी कस्तुरी हळदीचे चूर्ण आणि डाळीच्या पिठाच्या ऐवजी गव्हाचे पीठ किंवा तांदुळाचे पीठ, आरारूट, मुलतानी माती इत्यादींचा वापरही करू शकतो. हा रंग त्वचेसाठी लाभदायक आहे. जर २ लिटर पाण्यात २ चमचे हळदीचे चूर्ण टाकून पाणी चांगले उकळले, तर थंड झाल्यावर द्रवरूपातील पिवळा रंग बनतो, जो वापरता येतो.

ई. काळा रंग : आवळ्याचे चूर्ण लोखंडी भांड्यात रात्रभर भिजवून ठेवावे. सकाळी या मिश्रणात पाणी मिसळून ते गाळून घ्यावे.

उ. द्रवरूपातील लाल रंग : अर्धा पेला पाण्यात खाण्याचा चुना (खायच्या विड्यात उपयोग केला जाणारा चुना) आणि २ चमचे हळदीचे चूर्ण घालून मिश्रण बनवावे. हे मिश्रण किमान १० लिटर पाण्यात मिसळूनच वापरावे.

ऊ. बीटापासून बनवलेला जांभळा रंग : बीट कापून त्याचे लहान लहान तुकडे करावेत. या तुकड्यांना काही वेळ पाण्यात ठेवल्यावर जांभळा रंग बनतो.

बीट

ए. चमकदार पिवळा रंग : हा रंग बनवण्यासाठी झेंडूची सुकलेली फुले रात्री पाण्यात भिजवून ठेवावीत. सकाळी या पाण्यात थोडे हळदीचे चूर्ण घालावे. हे पाणी गाळून घ्यावे.

नैसर्गिक रंग बनवण्याची आणखी एक पद्धत आहे. यामध्ये झेंडू, पळस इत्यादीची फुले काही थेंब तेल टाकून उकळल्यानंतरही रंग बनतो. रंग खेळल्यानंतर स्नान करतांना नैसर्गिक घटकांपासून बनवलेले उटणे उपयुक्त असते. रासायनिक रंगांनी रंग खेळू नये आणि स्वतःचे अन् मित्र परिवाराचे शत्रू होऊ नये.

६. प्रश्न : धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी होणार्‍या अयोग्य प्रकारांमुळे काहींना हा सण साजरा करूच नये, असे वाटते. यावर हिंदूंची भूमिका कशी असायला हवी ?

उत्तर : धूलिवंदन आणि रंगपंचमी हे हिंदूंच्या सणांमागील धर्मशास्त्राचा अर्थ, उद्देश लक्षात घेऊन अन् देवतांप्रती भाव ठेवून शास्त्रानुसार साजरे करावेत. असे केल्यावर त्यातून चैतन्याचा अनन्यसाधारण लाभ होतो. दुर्दैवाने सध्या असे होत नाही. त्यामुळे सणांमध्ये अयोग्य प्रकार घुसडले गेले आहेत. यांमध्ये महिलांची छेडछाड, रंगांच्या पाण्याचे फुगे बलपूर्वक मारणे अशी चुकीची कृत्ये केली जातात. कुठून तरी पाण्याचा फुगा येऊन स्वतःचे कपडे भिजू नयेत, अशी भीती महिलांच्या मनात असते. मुंबईमध्ये किती तरी वेळा लोकल रेल्वेमध्ये असे रंगांचे फुगे लागल्यामुळे व्यक्तीचा डोळा किंवा कान यांना गंभीर प्रमाणात हानी पोचण्यासारखे प्रकार होतात. सणाच्या दिवशी अशा प्रकारे इतरांना त्रास देणारे कृत्य करणे, हे पापच आहे. यामुळे देवतेची अवकृपाही होते. युवकांकडून केल्या जाणार्‍या या चुकीच्या कृतींमुळे धर्मशिक्षणाची आवश्यकता पुन्हा एकदा समोर येते.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

संपादकीय भूमिका

सण-उत्सवांमध्ये घुसडले गेलेले अपप्रकार रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य !