संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा !
नवी देहली – भारताने आजपर्यंत जगातील कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही किंवा कुणाची एक इंचही भूमी बळकावली नाही. हे आमचे चरित्र आहे. (भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते ! – संपादक) मी असेही म्हणतो की, पाकव्याप्त काश्मीर आमचे होते आणि आमचे आहे. मला विश्वास आहे की, तेथील लोक स्वतःहून भारतात येतील. आताही तेथील लोक पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची मागणी करत आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
देशाच्या सुरक्षेसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलेली सूत्रे !
१. भारताला सध्या चीनकडून जर काही धोका असेल, तर आम्ही त्यास सामोरे जाऊ. भारत आता दुबळा राहिलेला नाही. भारत हा जगातील एक शक्तीशाली देश बनला आहे.
२. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारताचे २ सहस्र चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या चीनच्या नियंत्रणात आहे’, असा आरोप करून ते भारतीय सैनिकांच्या शौर्यावर आणि पराक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, हे अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांनी अशी विधाने टाळावीत. वर्ष १९६२ मध्ये काँग्रेसचे सरकार असतांना चीनने भारताचा किती भूभाग कह्यात घेतला ? मी तुम्हाला त्या सर्व गोष्टींची आठवण करून देऊ इच्छित नाही; परंतु निश्चिती बाळगा की, आम्ही भारताची एक इंचही भूमी जाऊ देणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मी येथे उघड करू शकत नाही; कारण भारत आणि चीन यांमध्ये चर्चा चालू आहे.
३. देवाने चीनला सद्बुद्धी देवो आणि त्याने भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये. भारताचे वैशिष्ट्य असे आहे की, भारत कुणालाही डिवचत नाही; पण जर कुणी भारताचा सन्मान दुखावला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमताही भारताकडे आहे. आपल्याला आपल्या शेजार्यांशी चांगले संबंध हवे आहेत. (शेजारी देशांकडून अशी अपेक्षा करतांना भारताने बलशाली असणे आवश्यक आहे. लहान मालदीवही चीनच्या समर्थनावरून भारताला डोळे वटारून दाखवत आहे. याचाही विचार करणे आवश्यक आहे ! – संपादक)