ध्यानमंदिरात आध्यात्मिक उपाय करतांना मनाची एकाग्रता होण्यासाठी भाव कसा ठेवावा ?

‘काही वेळा आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना झोप येते किंवा पुष्कळ विचार येतात. माझी एकाग्रता अल्प होते. अशा वेळी ‘मनाला नामजपादी आध्यात्मिक उपायांत कसे गुंतवावे ?’, या दृष्टीने देवाने सुचवलेले विचार येथे दिले आहेत.

ध्यानमंदिर

१. प्रार्थना करून सर्व देवता, गुरुपरंपरा, यंत्र आणि दिवा यांचे दर्शन घ्यावे.

२. प्रत्येक देवतेची प्रतिमा किंवा मूर्ती यांवर लक्ष एकाग्र करून त्यांना न्याहाळावे.

सौ. स्‍वाती शिंदे

३. भगवान शिवाकडे पहातांना ‘त्याच्या जटेतून वहाणार्‍या गंगेच्या प्रवाहाखाली आपण शुद्ध होत आहोत, भगवान शिव डमरू वाजवत आहे, त्यामुळे आपल्याला त्रास देणारी अनिष्ट शक्ती नष्ट होत आहे आणि नकारात्मक आवरण निघून जात आहे’, असा भाव ठेवावा.

४. भगवान श्रीकृष्णाकडे पहातांना ‘भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र आपल्या भोवती गोल फिरत असल्याने त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे आणि चैतन्याचे कवच निर्माण होत आहे. भगवंताने शंखनाद केला आहे आणि त्या नादामुळे सर्व अनिष्ट शक्ती पळून जात आहेत अन् आपल्या भोवतीचे नकारात्मक आवरण नष्ट होत आहे. आपण एकदम उत्साही आणि आपल्या दोषांशी लढायला सिद्ध झालो आहोत’, असा भाव ठेवावा.

५. हनुमंताचे दर्शन घेतांना पुढीलप्रमाणे भाव ठेवावा. ‘हनुमंताच्या चरणी डोके ठेवून त्याला नमस्कार करत आहोत. त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हाताकडे पाहून नामजप करावा. हनुमंताने आपल्याला आध्यात्मिक त्रास होत असलेल्या ठिकाणी किंवा डोक्यावर त्याची गदा ठेवली आहे. डोक्यावरील गदेचे टोक आपल्या आज्ञाचक्रावर ठेवले आहे, त्यामुळे आपले मन एकाग्र झाले आहे. आपले ध्यान लागले आहे. चैतन्य आणि शक्ती ग्रहण होत आहे.’

६. प्रभु श्रीरामाच्या चरणी डोके ठेवून नमस्कार करावा. त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हाताकडे पाहून नामजप करणे, त्याचे मोहक रूप न्याहाळणे, अशा कृती कराव्या.

७. दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करावी. त्यांच्या हातांकडे पाहून जप करावा. ‘त्यांनी त्यांच्या कमंडलूतील तीर्थ माझ्यावर शिंपडले आहे, त्यामुळे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे आणि मला उत्साही वाटत आहे’, असा भाव ठेवावा.

८. गणरायाच्या चरणी नमस्कार करावा. त्याच्या चरणांचा स्पर्श अनुभवावा. त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हाताकडे पाहून नामजप करावा. त्याच्या हातातील शस्त्र पहातांना अनिष्ट शक्तीचा त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. त्याने त्याची सोंड आपल्या डोक्यावर ठेवून आपल्याला चैतन्य आणि आशीर्वाद दिला आहे, त्याच्या चरणी वाहिलेल्या दूर्वा त्याने आपल्याला उपायांसाठी दिल्या आहेत, त्या आपल्या हातात आहेत’, असे अनुभवावे.

९. लक्ष्मीमातेला नमस्कार करून ‘आमच्यात गुरूंना अपेक्षित अशा गुणांची संपत्ती वाढू दे’, अशी प्रार्थना करावी. ‘तिचा चरणस्पर्श झालेल्या पाण्याने आपल्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण जात आहे, आपले मन शांत झाले आहे’, असे अनुभवावे.

१०. दुर्गामातेचे दर्शन घ्यावे. तिला नमस्कार करतांना तिच्या चरणांचा स्पर्श अनुभवावा. जो चरण तिने वर उचलला आहे, तो आपल्या माथ्यावर आहे. त्याच्या अंगठ्याचे टोक आपल्या आज्ञाचक्रावर आहे. ती आपल्याला आश्वस्त करत आहे’, असा भाव ठेवावा.

११. देवीची मूर्ती पहातांना ‘तिने खाली सोडलेला चरण आपल्या माथ्यावर आहे किंवा त्या चरणावर मस्तक ठेवून आपण नमस्कार करत आहोत’, असा भाव ठेवावा. तिच्या हातातील सर्व शस्त्रे पहावीत आणि त्यांची शक्ती अनुभवावी.

१२. गुरुपरंपरेची छायचित्रे पहातांना त्यांना न्याहाळणे, त्यांच्या डोळ्यांकडे पाहून जप करणे, त्यांचे स्मितहास्य पहाणे, असे करत त्यांची कृपा अनुभवावी.

१३. ध्यानमंदिरात ठेवलेल्या यंत्रांतून निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होत आहे. ‘ते रक्षक आहेत’, या भावाने कृतज्ञता व्यक्त करावी.

१४. नंदादीप पहातांना त्याच्या ज्योतीवर मन एकाग्र करावे आणि त्याची ज्योत हृदयात अनुभवावी.

१५. स्थानदेवतेचे चित्र पाहून सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी, तसेच गुरूंच्या कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.

१६. गुरुपादुका पहातांना त्यांचा स्पर्श अनुभवावा. त्यांवर नतमस्तक होऊन आज्ञाचक्रावर सद्गुरूंच्या अंगठ्याचा स्पर्श अनुभवावा.

१७. गुरुदेव ध्यानमंदिरात अनेकदा आले आहेत. नामस्मरण करतांना त्यांचे अस्तित्व अनुभवावे.

१८. बसण्यासाठी सर्व साहित्य आहे. पंखा, दिवा इत्यादी प्रत्येक वस्तू अविरत सेवा करतात. त्यासाठी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी.

१९. ध्यानमंदिराच्या बाहेर जी झाडे आहेत, तीही साधना करत आहेत. आश्रमाची शोभा वाढवत आहेत. त्यांचे लक्ष गुरूंकडे आहे. त्यांच्या माध्यमातून साधकांना विविध तत्त्वे मिळतात. यासाठी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांना प्रार्थना करावी, ‘मलाही अविचल राहून अविरत साधना सेवा करता येऊ दे.’

– सौ. स्वाती शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (५.६.२०२३)