EXCLUSIVE : महाराष्ट्रात केवळ १० पक्षांना मिळणार राखीव चिन्ह : ३७६ पक्षांना लढवावी लागणार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक !

शरद पवार यांच्या पक्षाची ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यताही गेली !

श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त असलेल्या केवळ १० पक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघांत राखीव चिन्ह मिळू शकेल. या व्यतिरिक्त ३७६ अमान्यताप्राप्त; परंतु नोंदणी असलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवायची असल्यास त्यांना मुक्तचिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, म्हणजेच त्यांच्या उमेदवारांना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षचिन्हाद्वारे निवडणूक लढवावी लागेल. खासदार शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ या पक्षाची ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यताही गेली !

हे आहेत महाराष्ट्रातील १० मान्यताप्राप्त पक्ष ! 

महाराष्ट्रात ‘आप’ पक्षाचा ‘झाडू’, बहुजन समाजवादी पक्षाचा ‘हत्ती’, भाजपचे ‘कमळ’, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ‘विळा’, काँग्रेसचा ‘हाताचा पंजा’, राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘घड्याळ’, शिवसेना ‘धनुष्यबाण’ (शिंदे गट), उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ‘मशाल’, मनसेचे ‘इंजिन’ आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे ‘पुस्तक’ असे महाराष्ट्रात मान्यताप्राप्त पक्ष आणि त्यांची अधिकृत चिन्हे आहेत. हे सर्व राजकीय पक्ष राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय असल्यामुळे या पक्षाचे उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, त्यांना त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह प्राप्त होईल.

‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ या पक्षाचा ‘प्रादेशिक’ दर्जा रहित !

शरद पवार

महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले, तसेच महाराष्ट्रातील सर्वांत ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ या पक्षाचा ‘मान्यताप्राप्त पक्ष’ हा दर्जाही रहित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय मान्यता यापूर्वीच रहित झाली आहे.

अजित पवार हे शरद पवार यांच्यातून वेगळे झाल्यावर निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा पक्ष ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असल्याचा निर्णय दिला. त्याचा फटका शरद पवार यांना बसला असून त्यांच्या ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ हा शरद पवार यांचा पक्ष ‘प्रादेशिक’ पक्षही राहिलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शरदचंद्र पवार गटाला दिलासा !

‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाला निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह दिले आहे. ‘राष्ट्रवादी पक्ष’ हे नाव आणि ‘घड्याळ’ चिन्ह मिळावे, यासाठी शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ‘तुतारी’ हे चिन्ह अन्य पक्षांनी न वापरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षालाच द्यावे’, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ‘राज्यमान्य पक्ष’ म्हणून मान्यता नसली, तरी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांना महाराष्ट्रात सर्व मतदार संघात ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक लढवता येणार आहे.

… तर चिन्हासाठी अर्ज करावा लागेल ! – निवडणूक अधिकारी

मान्यताप्राप्त पक्ष नसला, तरी नोंदणीकृत उमेदवार असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना सर्व मतदारसंघामध्ये समान चिन्ह हवे असल्यास त्यांना निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल, अशी माहिती उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली.

मान्यताप्राप्त पक्षासाठी निकष !

राष्ट्रीय मान्यता  !

अ. मागील लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान ४ राज्यांमध्ये त्या-त्या राज्यातील एकूण मतदानापैकी किमान ६ टक्के मते प्राप्त करावीत. यासह लोकसभेच्या ४ जागा जिंकल्या पाहिजेत.

आ. लोकसभेत किमान २ टक्के जागा किमान ३ वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.

प्रादेशिक (राज्यस्तरीय) मान्यता !

अ. विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्के मते आणि किमान २ जागा जिंकलेल्या असाव्यात.

आ. मागील विधानसभा निवडणुकीत एकूण जागांच्या किमान ३ टक्के जागा जिंकायला हव्यात.