इतरांना साहाय्य करणारे आणि संतांप्रती भाव असणारे गाजरवाडी, जिल्हा नाशिक येथील श्री. मोतीराम तुकाराम शिंदे (वय ८० वर्षे) यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. मोतीराम शिंदे यांना भेटवस्तू देतांना श्री. रवींद्र सोनईकर (उजवीकडे)

निफाड (नाशिक), १९ मार्च (वार्ता.) – गाजरवाडी (निफाड) येथील सनातनचे साधक श्री. मोतीराम शिंदे (वय ८० वर्षे) हे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले, ही आनंदवार्ता सनातनचे साधक श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी १४ मार्च या दिवशी गाजरवाडी येथील शिंदे यांच्या घरी झालेल्या एका सत्संगात उपस्थितांना दिली. ही वार्ता ऐकून उपस्थित साधकांची भावजागृती झाली. या वेळी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रवींद्र सोनईकर यांनी श्री. शिंदे यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला. श्री. शिंदे हे निफाड येथील सनातन संस्थेची साधिका कु. प्रियांका शिंदे हिचे आजोबा (वडिलांचे वडील) आहेत. या वेळी कार्यक्रमाच्या वेळी शिंदे यांची पत्नी आणि दोन्ही मुलगे, तसेच नातवंडे उपस्थित होती.

‘श्री. शिंदेआजोबा यांची आंतरिक साधना चालू आहे. ते नेहमीच देवपूजा करतात. ‘रामकृष्णहरि’ असा नामजप करतात. सनातनचे साधक घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करतात. त्यांच्यातील नम्रता, विचारून करण्याची वृत्ती आणि प्रेमभाव या गुणांमुळे त्यांचा सगळ्यांना आधार वाटतो’, असे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले.


श्री. मोतीराम शिंदेआजोबा यांची गुणवैशिष्ट्ये

फाल्गुन शुक्ल प्रतिपदा (११.३.२०२४) या दिवशी श्री. मोतीराम शिंदेआजोबा यांचा ८० वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांचे मुलगे आणि नात यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. मोतीराम शिंदे

१. नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. श्री. शांताराम मोतीराम शिंदे (श्री. शिंदे यांचा मोठा मुलगा) आणि श्री. सोमनाथ मोतीराम शिंदे (श्री. शिंदे यांचा लहान मुलगा)

श्री. शांताराम शिंदे

१ अ १. गरजवंतांना साहाय्य करणे : ‘आम्ही आमच्या वडिलांना प्रेमाने ‘तात्या’ असे संबोधतो. तात्या नम्र, प्रेमळ, प्रामाणिक आणि त्यागी वृत्तीचे आहेत. आमच्या लहानपणी तात्यांचे किराणा मालाचे दुकान होते. तात्या त्यातील वस्तू गरजवंतांना विनामूल्य देत असत. ते इतरांनी घेतलेले ऋण फेडत असत. त्यांनी आयुष्यभर माणसांमध्ये देव बघितला. त्यांनी आमच्यावर केलेल्या संस्कारांमुळे आम्हीही त्यांच्याप्रमाणेच घडलो आहोत. तात्यांचे गाजरवाडी परिसरातील आदिवासी लोकांवर प्रचंड प्रेम आहे. ते नेहमी गरजू व्यक्तींना तात्काळ साहाय्य करत असत. आदिवासी लोक त्यांना ‘बाप’ असे संबोधतात.

१ अ २. सतत २५ वर्षे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करणे : तात्यांनी शरीर साथ देत होते, तोपर्यंत म्हणजे २५ वर्षे खंड न पडू देता हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले. याचा समाजातील व्यक्तींना लाभ झाला. यातून तात्यांमधील ‘सातत्य, चिकाटी आणि तळमळ’ हे गुण दिसून येतात.

१ अ ३. निरपेक्ष असणे : त्यांच्या प्रत्येक कृतीमधून निरपेक्षभाव जाणवतो. ते कर्म करतात; मात्र फळाची अपेक्षा कधीच करत नाहीत.

१ अ ४. श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याप्रती भाव

श्री. सोमनाथ शिंदे

अ. तात्यांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे.

आ. एकदा सद्गुरु नंदकुमार जाधव नाशिक येथे आले होते. तेव्हा आमच्या घरी त्यांच्या महाप्रसादाचे नियोजन केले होते. त्या वेळी तात्यांनी सद्गुरु जाधवकाकांच्या महाप्रसादाचे नियोजन भावपूर्ण केले. तात्यांनी सद्गुरु काकांच्या चरणांवर डोके ठेवले. त्या वेळी सद्गुरु जाधवकाका आणि तात्या बोलत असतांना ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे आम्हाला वाटत होते. एकदा मी (श्री. शांताराम) सद्गुरु काकांना भ्रमणभाष केला होता. तेव्हा तात्या सद्गुरु काकांना ‘देवाच्या मंदिरात जातो. देवाचे दर्शन घेतो’, असे निरागसपणे सांगत होते.’

इ. साधक घरी आल्यावर तात्या साधकांना हवे-नको ते पहातात. ते साधकांची पुष्कळ काळजी घेतात.

१ आ. कु. प्रियांका शांताराम शिंदे (श्री. शिंदे यांची नात, मोठ्या मुलाची मुलगी)

कु. प्रियांका शिंदे

१ आ २. नातीला सेवेत साहाय्य करणे

अ. आजोबांमुळे माझी साधना होते. घरातील काही व्यक्तींनी कधी मला साधनेला विरोध केल्यास आजोबा खंबीरपणे मला पाठिंबा देतात. मला सेवेला जातांना कधीच अडचण येत नाही.

आ. आजोबा मला निवेदन देणे आणि फलक लेखन करणे, अशा सेवांमध्ये साहाय्य करत असत. ते मला दुचाकीने सेवेच्या ठिकाणी घेऊन जात असत आणि नंतर घरी घेऊन येत असत. आजोबा मला प्रत्येक सेवेत साहाय्य करत असत.

इ. नांदूर, मधमेश्वर येथे प्रशिक्षणवर्ग चालू होता. तेथे लाठी-काठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी काठ्या उपलब्ध होत नव्हत्या. त्या वेळी आजोबांनी नवीन काठ्या घेतल्या. त्यांनी काठ्या समान उंचीच्या कापल्या आणि त्यांना रंगही दिला.

ई. एकदा शिबिराच्या ठिकाणी आजोबा आले होते. शिबिरातील काही मुलींना त्यांच्या घरी पोचवायचे होते; पण वाहनाची व्यवस्था होत नव्हती. तेव्हा आजोबा मला म्हणाले, ‘‘मी चालत घरी जातो. तू या मुलींना त्यांच्या घरी पोचव.’’

१ आ ३. साधक घरी आल्यावर आनंद होणे : श्री. निरंजन चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५० वर्षे) आणि निफाड येथील श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे) घरी येत असत. तेव्हा आजोबा त्यांची आतुरतेने वाट पहात असत. त्यांना साधक घरी आल्यावर पुष्कळ आनंद होत असे. आजोबांना ‘साधकांची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे समजल्यावर ते मला म्हणाले, ‘‘दादा घरी आल्यावर आपण सण साजरा करूया. साधक घरी येणार, म्हणजे साक्षात् भगवंत येणार आहे.’’

२. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. श्री धनंजय काळुंगे, रामाचे पिंपळस, नाशिक

२ अ १. नातेवाइकांना जोडून ठेवणे : आजोबांनी कुटुंबातील व्यक्तींना जोडून ठेवले आहे. त्यांच्या सर्व नातेवाईकांमध्ये संघटितपणा जाणवतो. ते सर्वांशी आपुलकीने वागतात.

२ अ २. मी आजोबांच्या घरी गेल्यानंतर त्यांचा भाव जागृत होतो.

२ आ. श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे), नाशिक

२ आ १. ‘शिंदेआजोबा शांत, संयमी, प्रेमळ आणि नम्र आहेत. ‘त्यांच्यामध्ये ईश्वरी गुणांची वृद्धी झाली आहे’, असे मला त्यांच्याकडे पाहून जाणवले.

२ आ २. आजोबांकडे पाहून आनंद जाणवणे : एकदा मी शिंदेआजोबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा मला त्यांच्याकडे पाहून पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘त्यांचे मन निर्विचार झाले आहे’, असे मला जाणवले.

२ आ ३. मुले आणि नातवंडे यांच्यावर साधनेचे संस्कार करणे : श्री. शिंदेआजोबा वारकरी संप्रदायानुसार साधना करत आहेत. त्यांचे आचरण सत्त्वगुणी आहे. ‘शुद्धबिजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।’ (तुकारामगाथा, अभंग ३७, ओवी १) या उक्तीप्रमाणे आजोबांनी केलेल्या संस्कारांमुळे त्यांची दोन्ही मुले आणि नातवंडे साधना करत आहेत.’

(लेखातील सूत्रांचा दिनांक : २२.२.२०२४)