रामनाथ (अलिबाग) – लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून साकारलेल्या आणि गाज फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘कारगिल विजय रजत महोत्सवा’चे नववे पुष्प, महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अलीबाग शहरात १८ मार्च २०२४ या दिवशी दुपारी ३ वाजता रामनाथ (अलिबाग) पोलीस ग्राउंड येथे आयोजित करण्यात येणार आहे. वर्ष १९९९ चे कारगिल युद्ध ! १६ सहस्र फुटांच्या उंच पर्वतावर, रात्रीच्या निबिड अंधारामध्ये, उणे २० अंश सेल्सीअस तापमान, शत्रूकडून सातत्याने होणारा गोळीबार अशा प्रतिकूल परिस्थितीत शत्रूला चारी मुंड्या चीत करून, बटालिक सेक्टरवर तिरंगा फडकवणारे, ब्रिगेडीयर अजित सिंह आणि अत्यंत खडतर युद्धभूमीवर पॉईंट ५२०३ आणि ४८१२ कह्यात करून शत्रूला पळता भुई थोडी करून सोडणारे सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित कर्नल भलोथिया उपस्थित रहाणार आहेत.
लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभुदेसाई या दोनही योद्ध्यांसमवेत कारगिल युद्धाच्या चित्तथरारक अनुभवाविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराचा जागर करण्याचा, तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा लक्ष्य फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.
यासाठी विशेष करून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरखेल कान्होजी यांचे नववे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी केले.