पुणे येथे विनोद खुटे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाई !

गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचा परिणाम !

पुणे – ‘धनश्री मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या माध्यमांतून अधिक लाभाचे आमीष दाखवून गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) ‘व्ही.आय.पी.एस्. ग्रुप ऑफ कंपनीज्’ या आस्थापनाची मालमत्ता जप्त केली आहे. या ग्रुपचा मालक विनोद खुटे याची ३८ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता, तसेच अधिकोषातील २३ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. आरोपी विनोद खुटे हा फसवणूक करून दुबई येथे पसार झाला आहे. त्याच्या दुबईमध्ये अनेक सदनिका आहेत. (भारतामध्ये गुन्हे करून परदेशांमध्ये पळून जाणार्‍यांना अटक करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे ! – संपादक)

अंमलबजावणी संचालनालयाने काही दिवसांपूर्वी खुटे याच्या पुणे आणि अहिल्यानगर येथील कार्यालयांवर धाड टाकली होती. त्या वेळी या आस्थापनाकडून मोठ्या प्रमाणांवर चुकीचे व्यवहार केल्याचा आरोप होता. गुंतवणूकदारांचे पैसे ‘हवाला’द्वारे आणि शेल आस्थापनांद्वारे परदेशामध्ये पाठवले होते. या प्रकरणांमध्ये विनोद खुटे आणि अन्य काही जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.