सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत ! – मनमोहन वैद्य, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. मनमोहन वैद्य (डावीकडे) आणि संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री. सुनील आंबेकर 

नागपूर – संघ स्वयंसेवकांना प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची आधीपासून सवय असून हळूहळू सीमावर्ती भागातही अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत. दुसरीकडे देशभरात संघ संघटन वाढत आहे. अल्पसंख्यांक समाजाचेही अपसमज दूर होत असून ते अधिक जवळ येत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह श्री. मनमोहन वैद्य यांनी १५ मार्च या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. या वेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री. सुनील आंबेकर उपस्थित होते.

श्री. मनमोहन वैद्य पुढे म्हणाले की, देशभरातून आलेले १ सहस्र ५०० प्रतिनिधी, भाजप, विहिंप, राष्ट्रसेविका समिती, अशा ३६ संबंधित संघटनांचे प्रतिनिधींच्या उपस्थित होणार्‍या या बैठकीत देशापुढील आर्थिक, सामाजिक आणि शेतकरी प्रश्नी बैठकीत चर्चा होणार नाही. अयोध्येत श्रीराममंदिर लोकार्पणानंतर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने संघाची भूमिका याविषयी एक प्रस्ताव आणि नव्या सरकार्यवाह यांची, तसेच नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. आमच्या मते भारताचा १४० कोटी समाज हिंदु आहे; कारण आमचे पूर्वज हिंदु होते. आमची संस्कृती एक आहे. भारत आमची माता आहे. ज्यांना अल्पसंख्यांक म्हटले जाते, ते संघाच्या कार्यात सक्रीय आहेत. त्यांची भीती होती. संघाविषयी मनात अपसमज निर्माण झाले, ते दूर होऊन ते संघाच्या जवळ येत आहेत, असा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वर्षापासून अंतर्गत शिक्षणपद्धतीत पालट केले आहेत. या वर्षी प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. यंदा लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने संघाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना अधिकाधिक मतदान करण्याची विनंती करतील.