Indian Ocean Region Economic Power : पुढील ५०-६० वर्षांत हिंद महासागर क्षेत्र आर्थिक शक्तीचे केंद्र बनेल ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे

श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे

कोलंबो – हिंदी महासागर क्षेत्र प्रचंड आर्थिक वाढीचा अनुभव घेत आहे आणि येत्या ५०-६० वर्षांत ते एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र बनणार आहे, असे मत श्रीलंकेचे  राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार आणि आर्थिक संबंध याविषयी बोलतांना व्यक्त केले. श्रीलंकेचा ७६ वा स्वातंत्र्यदिन आणि भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी कोलंबो येथील ‘श्रीलंका-इंडिया सोसायटी’मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. याला संबोधित करतांना विक्रमसिंघे म्हणाले की, भारत, इंडोनेशिया, इराण आणि सौदी अरेबिया या देशांचा हिंदी महासागर क्षेत्राच्या विकासात मोठा वाटा आहे.

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे म्हणाले की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक बळकट होणे आवश्यक आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. ऐतिहासिक तथ्ये दाखवतात की, मोहेंजोदारो संस्कृती नांदत असतांनाही भारतातून नौका श्रीलंकेकडे रवाना झाल्या होत्या. श्रीलंकेतील अनुराधापुरा येथील प्राचीन गावांच्या उत्खननाच्या वेळी काही भागांत दक्षिण भारतातील नाणी सापडली होती.