Amit Shah POK : पाकव्‍याप्‍त काश्‍मीर हा भारताचा भाग असून तेथे रहाणारे सर्व लोक भारतीय !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए कायद्यावरून केले विधान !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – ‘नागरिकत्‍व सुधारणा कायदा (सीएए), हा धर्मावर आधारित आहे’ असे म्‍हणत जे त्‍याला विरोध करत आहेत, तेच लोक ‘मुस्‍लिम पर्सनल लॉ’ सारख्‍या कायद्याचे समर्थन करतात. पाकव्‍याप्‍त काश्‍मीर हा भारताचा भाग असून तिथे रहाणारे सर्व लोक भारतीय आहेत; मग ते हिंदु असो वा मुसलमान, अशा शब्‍दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कायद्याला विरोध करणार्‍यांवर टीका केली. ते येथे एका वृत्तवाहिनीच्‍या कार्यक्रमात बोलत होते.

निवडणूक रोखे योजना रहित केल्‍याने काळा पैसा परत येण्‍याची भीती !

निवडणूक रोख्‍यांच्‍या संदर्भात शहा म्‍हणाले की, भारतीय राजकारणातील काळा पैसा संपवण्‍यासाठी निवडणूक रोखे आणले गेले. पूर्वी काँग्रेसचे लोक रोखीने देणगी घेत असत. नेते १ सहस्र १०० रुपयांची देणगी घेतल्‍यानंतर पक्षाला केवळ १०० रुपये देत असत, ते १ सहस्र रुपये घरात ठेवायचे. हा भ्रष्टाचार आम्‍ही निवडणूक रोख्‍यांद्वारे संपवला.

रोखे योजना समाप्‍त करण्‍याच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचा मी आदर करतो. तथापि, मला भीती वाटते की, यामुळे काळा पैसा परत येईल. रोख्‍यांचा सर्वाधिक लाभ भाजपला झाल्‍याचा समज आहे. पक्षाला अंदाजे ६ सहस्र कोटी रुपये मिळाले आहेत. एकूण रोखे (सर्व पक्षांचे मिळून) २० सहस्र कोटी रुपये आहेत. मग १४ सहस्र कोटी रुपयांचे रोखे कुठे गेले ?, असा प्रश्‍न त्‍यांनी विचारला.