प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
१. वैषम्य आणि सृष्टी यांचा परस्पर संबंध !
‘वर्णव्यवस्थेत विषमता आहे. वैषम्य नाही. प्रकृतीच वैषम्याच्या भेदावर उभी आहे. वैषम्य आहे; म्हणून तर भेद आहेत; म्हणून तर सृष्टी आहे; म्हणून तर जीवन आहे. जीवनात नित्य नूतनता, ताजेपणा आणि रस आहे. वैषम्य संपले की, सृष्टीच संपली. विश्वाची साम्यावस्था म्हणजेच प्रलय ! मानव मनूची प्रजा आहे. मनूचे मानवावर पुष्कळ प्रेम आहे. त्याच्याजवळ आप-परभाव नाही. विषमता नाही.
२. विराट देहात विषमता कुठे ?
ब्राह्मण हे मुखापासून निर्माण झाले. बाहूपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य, तर पायांपासून शूद्र ! शूद्र हे परमात्म्याचे चरण आहेत. शूद्राचा तिरस्कार, म्हणजेच भगवंताच्या चरणांचा तिरस्कार ! चारही वर्ण मिळून एकच एक विराट देह ! कुठे आहे इथे विषमता ? माझे पाय आणि मुख यांच्यात वैर असू शकते का ? परमात्मा विराट असून त्यानेच सृष्टी निर्माण केली. वर्ण बनवले. त्यात तोच प्रविष्ट झाला. परमशांत, परमसम भगवंतात वैषम्य ? आकाशाला वाळूने बांधता येईल; पण परमात्म्याला अणूमात्र विषमतेचा गंध यायचा नाही. पायांनी त्यांचे स्वतःचे काम करायचे. पायाला तोंडाचे काम करणे शक्य नाही. प्रत्येकाने आपापले काम केले, तर देहाचे रक्षण, पोषण, संवर्धन होईल. देह पुष्ट होईल; म्हणून भगवान सांगतात….
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४५
अर्थ : आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत्प्राप्तीरूप परम सिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रितीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो, ती रित तू ऐक !
३. स्वभाव आणि प्रकृती यांप्रमाणे वर्तन करणे हाच धर्म !
चारही वर्ण परमात्म्याचे आहेत. त्या परमात्माच आहेत. कुणी लहान नाही. कुणी मोठा नाही. कुणी ब्राह्मण व्हावे. क्षत्रियाने क्षत्रिय, वैश्याने वैश्य, शूद्राने शूद्र व्हावे. कमळाने कमळ व्हावे. कमळ जर गुलाब होऊ इच्छित असेल, तर चाफा काही शेवंती बनू शकत नाही. तशी ईर्ष्या वाटली, तर तो नष्ट होईल. आंब्याने आंबा व्हायचे. कडुनिंबाने कडुनिंब ! बेडकाने बैल होण्याची आकांक्षा केली, तर तो नष्ट होईल. ज्याचा जो स्वभाव, प्रकृती, तोच त्याचा धर्म ! तसेच त्याचे आचरण ! त्यातच त्याला मुक्ती. परमात्मा प्राप्ती !
४. मानवता आणि अंतरात्मा एकच होय !
मानव वेगळे, मानवता एकच ! गायीचे कातडे, हरिणाचे कातडे, वाघाचे कातडे, डुकराचे कातडे, गर्दभाचे (गाढवाचे) कातडे, सिंहाचे कातडे सगळी पशूंची कातडीच ! पवित्र कर्माकरता, धर्माकरता मृगाजीनच (हरिणाचे मऊ कातडे – पूर्वीच्या काळी ऋषिमुनी साधनेसाठी बसतांना हरिणाच्या कातड्याचे आसन वापरायचे) घ्यायचे. गाढवाचे, घोड्याचे कातडे नव्हे ! मानव वेगळे. मानवता एकच आहे. ब्राह्मण हा ब्राह्मण आहे. क्षत्रिय हा क्षत्रिय आहे. अंतरात्मा एकच एक ! स्वभाव, प्रवृत्ती, शरीरे भिन्न. भेदातच अभेद पहायचा. वेद, व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड घालायची. व्यवहार आणि संसार येथे द्वैत अटळ आहे. परमार्थात निर्द्वंद्वता (द्वंदमुक्त – सुख-दुःख, राग, द्वेष यांपासून मुक्त), अद्वैत, अभेद ! उपनिषदे सांगतात, श्रुती सांगतात, तेच भगवान सांगतात.
‘क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १३, श्लोक २), म्हणजे ‘हे भारता (अर्थात् भरतवंशी अर्जुना), तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात् जीवात्माही मलाच समज.’
सगळी सृष्टी, समस्त अस्तित्व परमात्माच आहे. त्याविना अन्य काही नाहीच. स्वतःचा अंतरात्मा, क्षेत्रज्ञ, परमात्मस्वरूप ओळखायचा. विश्वातील परमात्मा जाणायचा. आपापले कर्तव्य, कर्म शास्त्रविधीनुसार समाधानाने, प्रसन्नतेने बुद्धीचे समत्व राखून पार पाडायचे.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०१८)