अमेरिकेत वैध स्थलांतर कर्मकठीण, तर अवैध स्थलांतर अत्यंत सोपे ! – इलॉन मस्क

युरोपात वैध अथवा अवैध दोन्ही प्रकारे होणारे स्थलांतर अत्यंत सोपे ! – नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स

डावीकडून गीर्ट विल्डर्स आणि इलॉन मस्क

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – अमेरिकी अब्जाधीश आणि ‘स्पेसएक्स’, तसेच ‘एक्स’ या आस्थापनांचे मालक इलॉन मस्क यांनी बेकायदेशीर स्थलांतराला विरोध केला आहे. त्यांनी ‘एक्स’वरून पोस्ट करतांना म्हटले की, अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचा पूर आला आहे. मी वेळोवेळी याविषयी चिंता व्यक्त केली असल्याने प्रसारमाध्यमे मला ‘स्थलांतरितांचा विरोधक’ अशा प्रकारे संबोधतात; परंतु हे खरे नाही. तसा तर मीही स्थलांतरितच आहे. मी बुद्धीमान, परिश्रमी आणि प्रामाणिक लोकांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेत गतीमानता आणण्याचा समर्थक आहे. अमेरिकेत वैधपणे स्थलांतर होण्याची प्रक्रिया कर्मकठीण, तसेच संतापजनकरित्या मंद आहे, तर अवैध स्थलांतर अत्यंत सोपे अन् क्षुल्लक पद्धतीने करता येते. याला काहीच अर्थ नाही.

मस्क यांच्या या पोस्टला नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांनी उत्तर देत म्हटले की, हे खरंच विचित्र आहे. यापेक्षा विचित्र गोष्ट जगातील माझ्या भागात घडते. येथे वैध अथवा अवैध अशा दोन्ही पद्धतीने स्थलांतर होणे अत्यंत सोपे आहे. यामुळे तरुण आफ्रिकी लोक आणि अन्य लोक ‘शरणार्थी’चे बनावट कारण घेऊन युरोपमध्ये घुसले आहेत. अमेरिका आणि युरोप येथे नव्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका 

भारतात याहून विचित्र परिस्थिती असून येथे अवैधपणे घुसलेल्यांना नागरिकत्व बहाल केले जाते, रहाण्यास सुरक्षित आश्रयस्थान मिळते आणि नोकर्‍याही दिल्या जातात. दुसरीकडे वैधपणे स्थलांतर करण्याची मागणी करणार्‍यांचे हालहाल होतात !