कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे  भवितव्य अंधारमय होणे ! – डिगंबर महाले, अध्यक्ष श्री मंगळग्रह संस्थान, अमळनेर

रत्नागिरी येथे एक दिवसाच्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ३०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग !

छायाचित्रात डावीकडून सर्वश्री अनुप जैस्वाल, दिलीप देशमुख, ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, सद्गुरु सत्यवान कदम, डिगंबर महाले आणि रमेश शिंदे , वेदमंत्रपठण करतांना वेदमूर्ती केतन शहाणे आणि श्री. अवधूत मुळ्ये

रत्नागिरी, ११ मार्च (वार्ता.) – संस्था, संघटना कोणतीही असो, त्यातील पदाधिकारी, चालक यांच्या विचारात सुस्पष्टता हवी, तरच मंदिरांचे व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकते. मंदिरे ही कालही भक्तांची होती, आजही आहेत आणि उद्याही रहातील. पुजारी विश्वस्तांना मिळणारा मान हा केवळ त्यांचा नसून तो देवाचा आहे. आज खरे आणि राजकीय हिंदुत्वनिष्ठ ओळखणे कठीण झाले आहे. देशात हिंदु समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात असूनही हिंदूंना मंदिर रक्षणासाठी विविध मागण्या कराव्या लागतात ? हे योग्य नाही आणि त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आता आपल्याला दबावतंत्रच अवलंबवावे लागेल. आपले कुठलेही एक मंदिर बंद होणे याचा अर्थ पुढील ७ पिढ्यांचे भवितव्य अंधारमय होईल, असे उद्गार श्री मंगळग्रह संस्थान, अमळनेर याचे अध्यक्ष श्री. डिगंबर महाले यांनी काढले.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने १० मार्च २०२४ या दिवशी येथील ‘श्रद्धा साफल्य मल्टिपर्पज हॉल’मध्ये मंदिरांचे जतन, संवर्धन अन् विश्वस्तांचे संघटन यांसाठी एक दिवसाचे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर ‘देवस्थान सेवा समिती’चे विदर्भ सचिव श्री. अनुप जैस्वाल, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, ‘श्री भार्गवराम परशुराम देवस्थान’चे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे उपस्थित होते.

समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या अधिवेशनास ३०० हून अधिक विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ आणि पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश कोंडस्कर आणि अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी केले.

श्री. डिगंबर महाले पुढे म्हणाले की,

श्री. डिगंबर महाले

कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर आहे; पण आज या मंदिराची स्थिती अत्यंत विदारक आहे. मंदिराला शासनाकडून केवळ २५० रुपयांचे अनुदान मिळत असल्याचे ऐकून वाईट वाटले. आज आई-वडील स्वत:च्या मुलांना ऊन-पावसाचाही त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेतात; आपणही त्या माऊलीचा विचार करायला हवा, तिची काय अवस्था झाली असेल ? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लढाईसाठी रणांगणावर जायचे, तेव्हा जिजामाता त्यांचे औक्षण करायच्या. ज्या भूमीत मंदिर आणि धर्म रक्षणासाठी लढा होतो, एवढा त्याग होतो, त्याच भूमीतील लोकांना देवाधर्माचा पैसा खाण्याची दुर्बुद्धी होतेच कशी ? कोकणात अनेक मंदिरे आहेत. येथील समाज सुखी-समाधानी आहे; मात्र भावनिक औदासिन्य दिसून येते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची अवस्था अशी आहे.

मंदिरांच्या व्यवहारात राजकारण नको, तर व्यवहार धर्मानुसार हवा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

१. छत्रपती शिवाजी महाराजांना परकियांच्या विरोधात लढावे लागले. आज आपलेच लोक निधर्मी बनून मंदिरे बळकावत आहेत, ज्यांच्याविरोधात आपल्याला मावळ्यांप्रमाणेच संघटन उभारावे लागेल.

२. आज बर्‍याच मंदिरात मानपानावरून भांडणे होतात. मंदिर रक्षणासाठी आपण स्वतःचे मानपान बाजूला ठेवायला हवेत. जिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उष्ट्या पत्रावळी उचलतो, तिथे आपण केवळ विश्वस्त आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.

३. राजकारणी व्यक्तींनी राजकारणच करावे, त्यांनी धर्म, मंदिर यात ढवळाढवळ करू नये.  आपल्या धर्मात राजकारण हा शब्द नसून राजनीती, धर्म नीती असे शब्द आहेत.

४. वंशपरंपरेनुसार मंदिराचा कारभार पहाता येणार नाही, या अनुषंगाने कायदा करण्यात येत आहे. जर नेहरू आणि गांधी यांचे घराणे राजकारणात पिढ्यान्‌पिढ्या राहू शकते, तर पुजारीच का नको ?

५. मंदिर सरकारच्या ताब्यात गेले, तर राजकीय मंडळी अन्य क्षेत्रांत जे घोटाळे करतात, ते गैरप्रकार मंदिरांतही चालू होतील.

६. विश्वस्तांच्या आपापसांतील भांडणामुळे सरकारला मंदिरांचे सरकारीकरण करण्याची संधी मिळून आपली मंदिरे बंद पडत आहेत. गझनीचा मेहमूद ज्या प्रकारे मंदिरांतून लूट करत होता, तेच कार्य स्वातंत्र्यानंतर सेक्युलर सरकार करत आहे. त्यामुळे गझनीचा महंमद  मृत्यू झालेला नाही, तर तो नव्या रूपात कार्य करत आहे.

७. हिंदूंचे एक मंदिर चांगले बनवल्यास ते एका राज्याला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तरप्रदेशमधील काशीविश्वनाथ कॉरिडॉर (सुसज्ज महामार्ग) आणि आता अयोध्येतील श्रीराममंदिर !

आध्यात्मिक ऊर्जेचे महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या मंदिरांसाठी अधिवेशन घ्यावे लागते, हे दुर्दैवी ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

श्री. सुनील घनवट

आपली मंदिरे ही आपले न्यायालय, औषधालय आणि आध्यात्मिक उर्जा यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. अशा मंदिरांसाठी आपल्याला आज अधिवेशन घ्यावे लागते, हे दुर्दैव आहे. हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी, मंदिरांच्या जागा परत मिळवण्यासाठी आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंना एकत्र यावे लागेल. संपूर्ण देशात साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. आता श्रीराममंदिर झाले; पण काशी, मथुरा यांसह प्रत्येक मंदिर पुन्हा भक्तांच्या स्वाधीन करणे, हे आपले दायित्व आहे.  महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून आपण एकत्रित प्रयत्न करूया. एकत्रित प्रयत्नाने प्रत्येक गोष्टीला यश प्राप्त होते. आज प्रत्येक ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) आहे, मग मंदिरातील प्रवेशनासाठीही वस्त्रसंहिताअसणे आवश्यक आहे  रत्नागिरी जिल्ह्यात ५५ मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता ! – अधिवक्ता अनुप जैस्वाल

अधिवक्ता अनुप जैस्वाल

आम्ही जेव्हा कार्याला प्रारंभ केला, तेव्हा न्यूनतम खर्चात, अल्प वेळेत मंदिराच्या भूमी परत घेणे, हे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार १२०० एकर भूमी परत घेतल्या.

आपापसांत समन्वय आणि इच्छाशक्ती नसल्यामुळे हिंदु मंदिरांच्या भूमीचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालेले आहे. जेव्हा शासनाचा सातबारा अस्तित्वात नव्हता, तेव्हा मंदिरे अस्तित्वात होती. तरीही आज जर सातबारा पाहिल्यास सर्व मंदिरांच्या भूमीवर ‘शासन’ असे नमूद केले आहे. काही ठिकाणी ‘आम्हीच मालक आहोत’, असे महसूल विभागास भासवून स्वतःची मालकी लावली असेल, तर त्याविरुद्ध आपण धर्मादाय आयुक्तांकडे पाठपुरावा करू शकतो. कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

जन्महिंदूला कर्महिंदु बनवण्याचे कार्य मंदिराच्या माध्यमातून होते ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक  

सद्गुरु सत्यवान कदम

मंदिरांचे महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर कला, संस्कृती, धर्म, अर्थ यांचे मंदिर हे केंद्र आहे. सर्व भेद विसरून हिंदू कुठे संघटित होत असतील, तर ते मंदिरांमध्ये. समाजाला बांधून ठेवण्याची, जन्महिंदूपासून कर्महिंदु बनवण्याचे कार्य मंदिराच्या माध्यमातून होत असते. हिंदु धर्मीय भाविक सश्रद्ध आहेत; पण त्यांचा धर्माचा अभ्यास नाही. धर्मशिक्षण नसल्याने धार्मिक नियमांचे पालन होत नाही. श्रद्धेने केलेल्या कृती लाभदायक ठरतात, असे अध्यात्मशास्त्र सांगते. धर्मशिक्षणाने मंदिर संस्कृती संवर्धन होण्यास साहाय्य होईल. ईश्वरी अधिष्ठान ठेवून कार्य केले, तर आध्यात्मिक प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरते. ईश्वराच्या आशीर्वाद मिळाल्याने कार्य यशस्वी होते. आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी प्रतिदिन किमान दोन-तीन तास काळानुसार साधना करणे आवश्यक आहे. कलियुगात नामसाधना ही काळानुसार आवश्यक आहे.

विश्वस्तांनी न्यासाचे कारभार काळजीपूर्वक करावेत ! – माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख

भारतातील पहिला विश्वस्त म्हणजे भरत. भरत हा अयोध्येचा विश्वस्त होता. विश्वस्तांना विकासाचा अधिकार आहे; पण नुकसानीचा नाही. हवी ती वस्तू वापरता येणार नाही. विश्वस्तांनी न्यासाचे कारभार काळजीपूर्वक करावेत. नियम, परंपरा, प्रचलित कायदे निर्देशांचे काटेकोर पालन करावे. स्वतःच्या पैशांची मिळकतीची ज्या प्रमाणे काळजी घेणार, तेवढीच विश्वस्तांच्या संपत्तीची काळजी घेणे आवश्यक आहे.

श्री. विनय पानवळकर

उपस्थितांचे स्वागत करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर म्हणाले, ‘‘मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. मंदिरात नियमित भगवंताची भेट होते, संकटांना तोंड देण्याची प्रेरणा आणि शक्ती मिळते, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन मंदिरांच्या माध्यमातून होते. अशा आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’

सन्मान

सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान मरुधर विष्णु समाज सेवा समितीचे श्री. दीपक देवल यांनी केला.

सत्कार

श्री. अनुप जैस्वाल यांच्या सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर यांनी केला.

दिलीप देशमुख यांचा सत्कार समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केला.

ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांचा सत्कार समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी केला.

श्री. रमेश शिंदे यांच्या सत्कार समितीचे सुरेश शिंदे यांनी केला. ह.भ.प. गणपत येसरे महाराज यांच्या सत्कार समितीचे हेमंत चाळके यांनी केला.