लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
पुणे – पक्षाचा अध्यक्ष कोण होते ? तुझ्या त्या अर्जावर माझी स्वाक्षरी आहे. हे लक्षात ठेव. मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका, असे म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांना चेतावणी दिली आहे. शरद पवार यांच्या मेळाव्याला येऊ नये; म्हणून सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना दमदाटी केली होती. यावरून शरद पवार यांनी सुनील शेळके यांना चेतावणी देत सुनावले आहे. ७ मार्चला लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला शरद पवार उपस्थित होते. या वेळी अजित पवार गटातील जवळपास १३७ पदाधिकार्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे; मात्र ‘या कार्यक्रमाला कुणीही जाऊ नये’, अशी चेतावणी आमदार सुनील शेळके यांनी दिली होती. यावरून या मेळाव्यातूनच शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना ही चेतावणी दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, मला असे समजले की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे येत आहात; म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कुणामुळे झाला ? तुझ्या सभेला कोण आले होते ? या मेळाव्यात बोलतांना शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.