प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिका नसल्याने उपचार करण्यास आधुनिक वैद्यांचा नकार !

उरुळी कांचन (पुणे) येथील घटना !

प्रतिकात्मक छायाचित्रं

उरुळी कांचन (जिल्हा पुणे) – रस्त्यावरून जातांना कुत्रा चावला म्हणून उपचार घेण्यासाठी आदेश राक्षे हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले; परंतु आरोग्य केंद्रामध्ये ‘परिचारिका नसल्याने उपचार करू शकत नाही’, असे वैद्यकीय अधिकारी आधुनिक वैद्य शुभम आवारे यांनी असे लेखी उत्तर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ५ मार्च या दिवशी घडला आहे. (अशा आधुनिक वैद्यांवर आरोग्य विभागाने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

आदेश राक्षे हे रस्त्यावरून जात असतांना त्यांना कुत्रा चावला. ते लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले. ‘केंद्रामध्ये ‘रेबीज’ हे इंजेक्शन उपलब्ध नाही’, असे सांगण्यात आले. त्यांनी बाहेरून आणून डॉ. आवारे यांना ‘इंजेक्शन’ देण्याची विनंती केली. त्या वेळी वैद्यकीय अधिकारी आधुनिक वैद्य आवारे हे ‘इन्स्टाग्राम’वर ‘रिल्स’ पहाण्यात दंग होते. त्यांनी राक्षे यांना ‘तुम्ही उद्या इंजेक्शन घ्या’, असा सल्ला दिला. ही घटना राक्षे यांनी उरुळी कांचन गावाचे माजी सरपंच संतोष कांचन आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांना सांगितली. त्यांनी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आवारे यांना विचारले असता आवारे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

संपादकीय भूमिका 

आधुनिक वैद्यांनी उपचार नाकारणे म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळणे ! त्यांची ही कृती वैद्यकीय सेवेला अपकीर्तीकारक आहे !